आधार संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन रोखीने मिळणार


मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी सध्या ते पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पण बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जून २०१७ पासूनचे मानधन रखडले असून ते सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मोहीम राबवून डिसेंबर २०१७ पर्यंत उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०१८ पासून त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) आयुक्तालयास दिले आहेत.

एक लाख ९२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात

राज्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या दोन लाख दोन हजार इतकी आहे. पूर्वी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने दिले जात असे. त्यासाठीचा निधी हा मंत्रालय, आयसीडीएस आयुक्तालय, जिल्हा कार्यालय, तालुका कार्यालय अशा विविध टप्प्यातून अंगणवाडी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत असे. या सर्व प्रक्रियेस फार विलंब लागत असे. हा विलंब टाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धती अवलंबिण्यात आली. या पद्धतीत मधले सर्व टप्पे रद्द होऊन आयसीडीएस आयुक्तालयातून थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होऊ लागले. त्यामुळे मानधनासाठी लागणारा विलंब टळला आहे.

यासंदर्भात माहिती देताना आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड म्हणाले की, पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आतापर्यंत एक लाख ९२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश झाला असून सध्या त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा होत आहे. उर्वरित साधारण १० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे त्यांचे जून २०१७ पासूनचे मानधन अदा करता आलेले नाही. सध्या या कर्मचाऱ्यांना जून ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे मानधन जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून त्यांना प्रलंबित मानधन तातडीने रोखीने अदा केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आधार संलग्नतेसाठी मोहीम राबवा- पंकजा मुंडे

मंत्री पंकजा मुंडे यासंदर्भात म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळणे आवश्यक आहे. यासाठीच महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेऊन अत्याधुनिक अशी पीएफएमएस प्रणाली विकसीत केली आहे. पण काही तांत्रिक कारणास्तव साधारण १० हजार अंगणवाडी कर्मचारी अद्याप या पद्धतीत येऊ शकलेले नाहीत. या कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करुन त्यांना पीएफएमएस प्रणालीत आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०१७ अखेर या कर्मचाऱ्यांना पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आणून जानेवारी २०१८ पासून त्यांचे मानधनही थेट बँक खात्यात जमा करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी आयसीडीएस आयुक्तालयास दिले.