सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबातमी
मुंबई : ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर राज्यातील सहकारी संघांना अडचणीतून बाहेर काढून अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकारी संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सहकारी संघाला यापूर्वी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी जो निधी मिळत होता तो पुन्हा सुरु करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सहकारी संघाच्या शतक महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सहकारी संघाचे अध्यक्ष सुहास तिडके, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शासन सहकार क्षेत्र अधिक भक्कम कसे होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था सक्षम झाल्या पाहिजेत, त्यादृष्टीने शासन निर्णायक वाटचाल करत आहे. एखाद्या संस्थेचा 100 वर्षांचा प्रवास पूर्ण होतो तेव्हा तो काळ फार महत्वाचा आणि संस्थेच्या कार्याला तपासण्याबरोबरच पुढच्या 50 वर्षांचे नियोजन करण्याचा असतो. त्यामळे हे शतक महोत्सवी वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. या सहकारी संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकारी संघाचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सहकार्यातून सहकार क्षेत्र सक्षम करणे गरजेचे- सुभाष देशमुख
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, सहकारी संघांनी अनुदानातून नाही तर योगदानातून सक्षम व्हावे. सहकारी संघाची मोठी साखळी आहे त्या साखळीचा वापर करून सहकार शुद्धीकरणाबरोबरच पारदर्शक कार्यावर अधिक भर द्यावा. सर्वांच्या सहकार्यातून सहकार क्षेत्र सक्षम करावे. राज्यातील सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यात अटल पणन अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत असून त्या माध्यमातून बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करत आहे. त्याचबरोबर बंद पडलेले साखर कारखाने, सूतगिरण्या सुरु करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला पाहिजे. ज्या संस्था सक्षम आहेत त्या संस्थांनी छोट्या संस्थांचे पालकत्व घेऊन त्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री पाटील म्हणाले, राज्यात सहकार चळवळीचे मोठे योगदान असून अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना समृद्ध करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.