मराठवाडा स्वच्छ, हिरवागार करण्याचा संकल्प करु या - आयुक्त डॉ.भापकर


        रिपोर्टर.. औरंगाबाद : समाजाच्या विकासाची जबाबदारी ही युवापिढीच्या खांद्यावर असते, या जबाबदारीची जाणीव विद्यार्थी दशेत रुजवणारा राष्ट्रीय सेवा योजना हा महत्वाचा उपक्रम आहे. तरी त्यातून युवकांनी ‘चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा घेऊ’ या वृत्तीतून या विकास कामामध्ये योगदानाकरीता विद्यार्थ्यांनी गावाकडे जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्या घरात, आपल्या गावात द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

सौ.इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय व माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जलदुत या स्वंयसेवी संस्थेमार्फत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे श्रमदान विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.भापकर बोलत होते यावेळी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सि.एम.राव, सौ.इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाच्या प्राचार्य वसुधंरा पुरोहित, डॉ.शितल बारहाते, जलदुत किशोर शितोळे, डॉ.प्रराग चौधरी, डॉ.मिनाक्षी देव यांची उपस्थित होती.

15 सप्टेंबर 2017 ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत “स्वच्छता हीच सेवा” ही मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत असून या मोहिमेचा प्रारंभ श्रमदान करून आज करण्यात आला. मोहिमेत 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील सर्व नागरी भाग हगणदारीमुक्त घोषित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तसेच शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणजे मनरेगा या मोहिमेतून 80% गरजू लोकांना काम मिळाले आहे. तसेच जलसंधारण योजना, घरकूल योजना अशा विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.

समाजाच्या शाश्वत विकासासाठी नागरिकांना स्वच्छता, श्रमदान, राष्ट्रीयता या भावनेतून माझं गाव, माझा परिसर, माझा देश स्वच्छ, सुंदर, हिरवाईने समृद्ध असावा ही भावना जितक्या जास्त प्रमाणात जाणवत राहील तितक्या अधिक गतीने शासन प्रशासनाच्या योजना खऱ्या अर्थाने लोकसहभागातून अपेक्षित परिणाम साध्य करतील हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपण आहोत तेथे स्वच्छता, पर्यावरणानाचा समतोल या दुरगामी परिणाम करणाऱ्या महत्वाच्या गोष्टी जपण्याच्या दृष्टीने कृतीशिल राहण्याची गरज आहे, असे सांगून भापकर म्हणाले की, विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी स्वयंमसेवी संस्था, शाळा महाविद्यालय या पद्धतीने समाजातील प्रत्येक घटक स्वच्छता, विकास प्रक्रियेत सहभागी होईल इतक्या लवकर आपण स्वच्छ नागरी अभियानाचे ध्येय प्राप्त करू शकू.

`कोसळू दे डोंगर उसळू दे सागर, रोखण्यास माझे हात समर्थ आहे`, अशा चैतन्यदायी ओळीतून डॉ.भापकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शासन योजनांचे महत्व व त्यातून तुमचा सहभाग याचे विस्तृत मागदर्शन केले.