अवयवदान ही लोकचळवळ बनली पाहिजे - डॉ. गजानन परळीकर


उस्मानाबाद : अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे गैरसमज दूर करुन अवयदान लोकचळवळ बनण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अवयवदान मोहीम समन्वयक डॉ.गजानन परळीकर यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने चिकुंद्रा तालुका तुळजापूर येथे आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. विलास जोंधळे, महिला हक्क संरक्षण अधिकारी दिनेश घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. परळीकर म्हणाले की, ज्याप्रमाणे जनजागृतीच्या माध्यमातून देशात रक्तदानाची चळवळ उभी राहिली त्याप्रमाणे अवदानाचीही चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. यासाठी या मोहिमेमध्ये सर्वांनी मिळून सामुहीक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अवयवदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे,असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. जोंधळे म्हणाले की, वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विविध व्यवसायावर आधारित अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज आहे.

यावेळी महिला हक्क संरक्षण अधिकारी दिनेश घुगे यांनी महिला विषयी शासनाच्या विविध योजना व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. तसेच महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” हे मासिक राज्य शासनातर्फे दरमहा प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनाची माहिती मिळते, त्याचबरोबर स्पर्धापरिक्षेसाठी उपयुक्त असणारे मासिक आसल्याने लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती दिली.

या संवाद पर्व कार्यक्रमात "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमाची चित्रफीत, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कामाची चित्रफीत तसेच बळीराजा चेतना अभियानावरील लघुपट उपस्थितांना दाखविण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सत्यवान गायकवाड यांनी केले व आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाविषयीची माहिती दिली. कार्यक्रमास गणेश मंडळाचे पदाधिकारी कल्याण मोटे, दिपक मोटे, प्रमोद गायकवाड, सौदागर मोटे, गणेश गायकवाड, गोविंद गायकवाड, सुधाकर गायकवाड, सहदेव जाधव, नितीन गायकवाड, गिरीधर मोटे, भैरव मोटे, श्रीकांत गायकवाड, भगिरथ गायकवाड, चांगदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थांची तसेच विशेष करुन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.