मुर्त‍िजापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी घुगंशी बॅरेजमध्ये पाणी अडवणार - रणजीत पाटील


पाणीटंचाई विषयी सर्व यंत्रणेनी गंभीर राहावे

अकोला : 
यावर्षी अपुऱ्‍या पावसामुळे पाणी टंचाईची परिस्थ‍िती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेऊन पाणी टंचाई विषयी गंभीर असावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाला दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात मुर्त‍िजापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासंबंधी तसेच जिल्ह्याच्या पाणी टंचाईबाबत आढावा बैठक पालकमंत्री यांच्या उपस्थ‍ितीत आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुर्त‍िजापूरचे आमदार हरिष पिपंळे, जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय, मुर्त‍िजापूरच्या नगराध्यक्षा मृणाल गावंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांची प्रमुख उपस्थ‍िती होती.

मुर्त‍िजापूर तालुक्यातील घुगंशी बॅरेजचे गेट खाली घेऊन पाणी अडवण्याच्या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी पालकमंत्री डॉ.पाटील यांनी बैठकी दरम्यान दूरध्वनी वरून चर्चा केली. त्यांना मुर्त‍िजापूर शहराचा पाणीपुरवठ्याबाबतची माहिती दिली. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे मुर्त‍िजापूर शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घुगंशी बॅरेचे गेट खाली करून परतीच्या पावसाचे पाणि अडवल्यास काही प्रमाणात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तोडगा निघू शकतो. त्यासंबंधी पाटबंधारे विभाग अमरावती यांना पाणी अडविण्यासंबंधात निर्देश पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिले. येत्या 2 ते 3 दिवसांत घगंशी बॅरेजचे गेट खाली करून पाणी अडविण्याची कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी अपुऱ्‍या पावसामुळे पाणी टंचाईची परिस्थ‍िती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांनी रब्बीच्या हंगामा साठी धरणातून किंवा नदीच्या पात्रातन पिकासाठी पाणी घेऊ नये शेतकऱ्‍यांनी गहू किंवा हरभऱ्याची पेरणी करतांना आपल्याकडे पाण्याचा पुरेसा साठा आहे किवा कसे याबाबत विचार करून पेरणी करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.