देशातील पहिलं वृक्ष लागवड संमेलन महाराष्ट्रात.....- सुधीर मुनगंटीवारImage result for mungantiwar 
मुंबई,  : देशातील पहिले वृक्ष लागवड संमेलन महाराष्ट्रात आयोजित होत असून ते राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी  राजभवन येथे होईलअशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या संमेलनाच्या माध्यमातून राज्य शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत तसेच नदी स्वच्छता व  नद्यांचे पुनरुज्जीवन या कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळवत जनजागृती आणि लोकप्रबोधनकरण्यात येणार असल्याची माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राजभवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, श्रीमती शायना एन.सी, भारतरत्न सचिन तेंडूलकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह राज्यातील नामवंत उद्योगपती, चित्रपटक्षेत्रातील मान्यवर, मुद्रित, द्रृकश्राव्य तसेच समाज माध्यमात काम करणारे प्रमुख मान्यवर, बँकक्षेत्रातील पदाधिकारी,  जीवन विमा कंपनी आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, नागरी विमान सेवाक्षेत्रातील अधिकारी, इंडियन मर्चट चेंबर  ॲण्ड कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, शासनाच्या विविध विभागांचेप्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या सर्व मान्यवरांचे समाजामध्ये खुप आदराचे स्थान आहे. त्यांनी दिलेले संदेश आणि विचार याचा समाजाकडून सन्मान केला जातो, त्यांचे विचार स्वीकारले जातात, हे लक्षात घेऊन हे सर्व मान्यवर जर राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी वृक्ष लागवड आणि नदी स्वच्छता आणि नदी पुनरुज्जीवनाचा विचार लोकांसमोर मांडला, त्यासंबंधीचे आवाहन केले तर हे दोन्ही कार्यक्रम वेगाने पुढे जाण्यास मदत होणार आहे. ईशा फाऊंडेशनने “रॅली फॉर रिव्हर”  हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच त्यांनी तामिळनाडू मध्ये वन आणि वृक्षाच्छादन वाढावे म्हणून २००६ पासून वृक्षारोपनाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे.  महाराष्ट्रात देखील ईशा फाऊंडेशनशी संबंधित अनेक लोक आणि स्वंयसेवक जोडले गेले आहेत. त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातही या दोन विषयावर लोकचळवळ निर्माण केली जाणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नवी मुंबई येथे दि. १ जुलै २०१७ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव उपस्थित होते. त्यावेळी ‘रॅली फॉर रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील नद्यांच्या दोन्ही काठावर ईशा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागातून वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात या दोन्ही कार्यक्रमांना गती देण्यासाठी तसेच या सर्व मान्यवरांच्या सहभागातून व्यापक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून राजभवन येथे हा  वृक्ष लागवड संमेलना” चा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारचे वृक्ष लागवड संमेलन आयोजित करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ईशा फाऊंडेशनचे स्वंयसेवक साऊंडस ऑफ ईशा हा कार्यक्रम सादर करतील त्यानंतर उपस्थित मान्यवर वृक्षारोपण कार्यक्रम  आणि रॅली फॉर रिव्हर  या विषयावर एकत्रितपणे काम करण्याचे प्रतिक म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात मानवी भिंत तयार करतील. वाळूचा वापर करून कलात्मकतने संकल्पनेचे सादरीकरण करणारे कलावंत वनमहोत्सव आणि रॅली फॉर रिव्हर या विषयावर आपली कलाकृती सादर करतील. कार्यक्रमात वृक्ष लागवड आणि रॅली फॉर रिव्हर या दोन विषयाच्या अनुषंगाने उपस्थित मान्यवर शपथ ही घेणार आहेत.