विकास योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा - विभागीय आयुक्त डॉ. पाटील


कोकण विभागातील संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण

      
रिपोर्टर--   नवी मुंबई ...: शासन ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा असतो आणि त्यातूनच आदर्श ग्रामपंचायती तयार होतात, असे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी केले.

कोकण विभागातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016-17 अंतर्गत कोकणातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना आज विभागीय आयुक्त यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे विवेक भिमनवार, उपायुक्त (विकास) गणेश चौधरी, यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, हे मानवी विकासाचे निर्देशांक आहे. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. आपल्या गावासाठी चांगल्या सोयी निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले दरडोई उत्पन्न वाढण्यापेक्षा जीवनमान उंचावणे जास्त महत्त्वाचे आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे त्यांनी अभिनंदन केले. आपली जबाबदारी आता वाढली आहे.

श्रीमती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील ही रोहा तालुक्यात धाटाव ग्रामपंचायतीला मिळालेला प्रथम पुरस्कार सर्वांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे. ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून देशात व राज्यात ओळखली जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी समूह विकासासाठी पुढे यावे.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत ग्रामपंचायत धाटाव ता.रोहा जि.रायगड या ग्रामपंचायतीस विभाग स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रथम क्रमाकांचा 10 लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला. तर ग्रामपंचायत आंदुर्ले ता.कुडाळ जि.सिंधुदूर्ग व ग्रामपंचायत भोगवे ता.वेंगुर्ला जि.सिंधुदूर्ग यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचा 8 लाख व 6 लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटूंब कल्याण) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत पास्थळ ता.जि.पालघर यांना प्राप्त झाला आहे. स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत देवघर ता.खेड जि.रत्नागिरी प्राप्त झाला आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.30 हजार ग्रामपंचायत म्हाळुंगे ता.भिवंडी जि.ठाणे यांना प्राप्त झाला आहे.

या कार्यक्रमास कोकण विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्राम विकास अधिकारी, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते. उपायुक्त (विकास) गणेश चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त माणिक दिवे यांनी आभार मानले. डॉ.तरुलता दानके यांनी सुत्रसंचलन केले.