स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उर्दू लोकराज्य उपयुक्त - मुख्याध्यापक अली

उस्मानाबाद : अल्पसंख्याक समाजातील विशेषत: उर्दू भाषिकांना आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शालेय पाठ्यक्रमातील अभ्यासाच्या पुस्तकाव्यतीरिक्त उर्दू भाषेतून प्रकाशित होणारे लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन मुध्याध्यापक मीर एजाज अली यांनी केले.

उस्मानाबाद येथील अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूलमध्ये आज जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबादच्या वतीने उर्दू लोकराज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षक सय्यद फैसलअली, पठाण अखिल, शेख तलत फातेमा, शेख आर्शिया, जिल्हा माहिती कार्यालयातील भिमा पडवळ, आश्रुबा सोनवणे, सिद्धेश्वर कोंपले, सचिन मोरे उपस्थित होते.

या मासिकाच्या माध्यमातून शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अल्पसंख्यांकाच्या योजना, मंत्रिमंडळाचे निर्णय, विविध उपक्रम, शासन निर्णयासह विविध सामाजिक, सांस्कृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल. शासनाने उर्दू भाषिकांसाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित व्हावे याकरिता या शाळेतील शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होणे गरजेचे आहे. अल्लामा सिद्दीक अहमद उर्दू हायस्कूल या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी या मासिकाचे वर्गणीदार होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उर्दू भाषिकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या उद्देशाने लोकराज्यची उर्दू आवृत्ती प्रत्येक उर्दू भाषिकांपर्यंत पोहोचावी तसेच विद्यार्थी व युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. उर्दू भाषेत दर्जेदार आणि अचूक ज्ञान देणारे लोकराज्य हे एकमेव मासिक आहे. या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असून वर्गणीदारांना दरमहा अंक पोस्टाने घरपोच पाठविण्यात येतो. उर्दू भाषेचे जतन-संवर्धन व भाषेला चालना देण्याची यामागची शासनाची भूमिका आहे. उर्दू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय, सामाजिक, सांस्कृतिक विषयाची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यास मदत होईल त्यासाठी उर्दू भाषिक व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे वाचन नियमित करावे व सर्वांनीच वर्गणीदार व्हावे, असे आवाहन माहिती सहायक यासेरोद्दीन फहद मखदूम काझी यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना उर्दू लोकराज्य मासिकाचे अंक भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.