लॉजीस्टिक पार्कमुळे निर्यातदारांची पहिली पसंती मिहानला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  • अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज सुविधांचा प्रारंभ
  • अत्याधुनिक विमानतळाच्या बांधकामाला मंजुरी
  • एव्हिएशन उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक
  • टाटा उद्योग समुहातर्फे गुंतवणुकीसाठी पुढाकार
  • लॉजेस्टिक पार्कमुळे निर्यातीला प्रोत्साहन

नागपूर :
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन रनवे तयार करताना निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेवून लॉजीस्टिक पार्क तयार करण्यात येणार असल्यामुळे देशातील निर्यातीसाठी मिहानला प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या कार्गो इमारतीमध्ये यु.एस. एन्टरप्रायजेस या जागतिक लॉजेस्टिक कंपनीतर्फे निर्यातदारांसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, आमदार समीर मेघे, माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सुरेश काकाणी, विमानतळाचे संचालक एस. व्ही. मुळेकर, युएस एन्टरप्राजेसचे उल्हास मोहिले, प्रसाद वैशंपायन, अभिजीत फडणवीस यावेळी उपस्थित होते.लॉजीस्टिक हबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, देशात जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर नागपूर येथून मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्राधान्य राहणार आहे. त्यादृष्टीने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाला मंजूरी देण्यात आली असून बांधकामाच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. मिहानमध्ये येत्या काळात मोठी गुंतवणूक होत आहे. एव्हीएशन क्षेत्रात बोइंग एमआरओ, अंबानी एव्हिएशन उद्योगांबरोबरच टाटासोबत चर्चा सुरू असून येत्या काळात मोठा प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मिहान येथे रामदेव बाबा यांच्या फळ प्रक्रिया उद्योगासोबतच इतरही उद्योगांनी येथे उद्योग सुरू करण्यासंबंधी मागणी केली आहे. फळ प्रक्रिया उद्योगाच्या निर्यातीसाठी शितगृह साखळीची मागणी लक्षात घेवून ही सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. भविष्यात यापेक्षा मोठ्या शितगृहाची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दीपप्रज्ज्वलीत करून शितगृहाचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय कार्गो इमारतीध्ये दोन मोठ्या शितगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून शितगृहामधून मालवाहतूक विमानांच्या माध्यमातून थेट निर्यात करणे सुलभ होणार असल्यामुळे विमानतळावरच कोल्ड स्टोरेजची सुविधा निर्यातीला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय लॉजेस्टिक क्षेत्रातील युएस एन्टरप्रायजेस यांनी दोन शितगृहाच्या माध्यमातून सुमारे 10 मेट्रीक टन साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथून नाशवंत वस्तूची सुद्धा हाताळणी होणार असल्यामुळे निर्यातदारांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत.

श्री.मोहिले यांनी स्वागत करून कोल्ड स्टोरेज प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पासाठी 16 लाख रूपयाची गुंतवणूक करण्यात आली असून निर्यातदारांचा मागणीनुसार या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. राजीव पोद्दार, संजय भेंडे, युएस एन्टरप्रायजेसचे प्रशांत वैशंपायन, फेजर केसरवानी, श्रीमती कीर्ती मोहिले, अभिजीत फडणवीस, विमानतळ प्राधिकरणाचे अबिद रुही, मिहानचे तांत्रिक संचालक एस.व्ही.चहांदे, एस.के. चटर्जी आदी उपस्थित होते.