
अकोला : आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शासनाचा प्रतिनिधी या नात्याने पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. शेगाव येथे 19 व 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यमे अधिस्वीकृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. 20 ऑगस्ट रोजी डॉ. पाटील यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समितीची अध्यक्ष यदु जोशी यांनी डॉ. पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर, मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, नागूपर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी आदींसह सर्व उपसंचालक, समितीचे सदस्य उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, समाजातील सामान्य नागरिकांचे अश्रू पुसण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम पत्रकार करतात. काळानुरुप पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. त्याबरोबर ताणही वाढलेला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व सुरक्षेचे कवच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक अडचणींचा सामना पत्रकारांना सातत्याने करावा लागतो. या अडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. प्रारंभी श्री. जोशी यांनी प्रस्तावना करताना समितीचे कार्य विषद करुन पत्रकारांच्या अडचणी मांडल्या. राधाकृष्ण मुळी यांनी आभार मानले. |