जि,प,प्रशालेला इंटरनॅशनल स्कुल बनवू - उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील


          रिपोर्टर..      तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु) येथील जि.प.प्रशाला हि सर्व मूलभूत सोईसुविधा युक्त तसेच गुणवत्ता प्रधान असून भविष्यात या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी इंटरनॅशनल स्कुल सारख्या सुविधा जि.प.च्या माध्यमातून उपलब्ध करून देवू असे आश्वासन जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी दिले.
आरळी (बु) प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ISO प्रशालेच्या शुभारंभ व प्राथमिक शाळेच्या ई-लर्निग वर्गाच्या उदघाटन प्रसंगी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील बोलत होत्या. यावेळी आ.मधुकरराव चव्हाण, पं.स.सभापती शिवाजी गायकवाड, मा.जि.प.अध्यक्ष धीरज पाटील, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, प्रा.अस्मिता कांबळे, पं.स.सदस्य कविता कळसुरे, सरपंच ज्योती सुनील पारवे, गट शिक्षण अधिकारी कल्याण सोनावणे, विस्तार अधिकारी मल्हारी माने, शिक्षक नेते बशीर तांबोळी, कल्याण बेताळे, मुख्याध्यापक भास्कर ओव्हळ, मुख्याध्यापिका अनुपमा गव्हाणे, आदींची उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या कि, जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या प्रशाळांपैकी अरळीची प्रशाळा हि आगळेवेगळी व वैशिट्यपूर्ण असून जिल्ह्यातील पहिली  ISO प्रशालेला तर बनवूच शिवाय डिजिटल प्रशाळेबरोबरच भविष्यात इंटरनॅशनल स्कुलचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच या प्रसंगी शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी व ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून शाळेच्या सर्व वर्ग खोल्यामध्ये स्मार्ट एलईडी टीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रशालेच्या पोषण आहार शिजवण्यासाठी गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचित केले. तसेच या प्रशालेमधून कला व क्रीडा प्रकारातील विद्यार्थी विभाग व राज्य स्तरापर्यंत निवड झाल्याने त्यांचे हि यावेळी अभिनंदन केले. 
यावेळी बोलताना आ.मधुकरराव चव्हाण म्हणाले कि, आरळी गावाला ऐतिहासिक व संस्कृक्तिक वारसा असून येथील विद्यार्थी हा वारसा पुढे घेवून जात असून हि शाळा जिल्ह्यात गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्यासाठी शिक्षकांनी व गावकऱ्यांनी प्रयत्न करावा असेही सांगितले, 
यावेळी बोलताना पं.स.सभापती शिवाजी गायकवाड म्हणाले कि, आरळीची प्रशाला सुवर्ण महोत्सव साजरा करणारी पहिलीच प्रशाला असून त्यांचे विशेष अभिनंदन केले. 
यावेळी बोलताना जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे म्हणाले कि आरळी यागावाने अनेक राज्यस्तरीय उपक्रम राबवून तसेच गुणवत्ता प्रधान शाळा घडवत आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले.
यावेळी जि.प.प्रशालेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विविध माध्यमातून आर्थिक सहकार्य करत शाळेचा कायापालट केला. यामध्ये मुलांना मूलभूत व भौतिक सुविधा, शाळेला रंग रंगोटी, शौचालय दुरुस्ती, हॅन्ड वॉश स्टेशन, वृक्षारोपण, झाडांना ट्री-गार्ड, शाळेला लोखंडी कमान आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच आरळीच्या रत्नांनी या स्नेह मेळाव्या मध्ये आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षण प्रेमी नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भास्कर ओव्हळ, सूत्र संचालन विशाल सूर्यवंशी तर आभार संजय पारवे यांनी मांडले.