अकोल्याचे जिल्हाधिकारी रमले गणेश मूर्ती तयार करण्यात
  • शाडू मातीपासून जिल्हाधिकाऱ्यांनी बनविली सुबक गणेश मूर्ती
  • पर्यावरणाच्या रक्षणासाठी मातीच्या गणेश मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन

अकोला : 
गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शाडू मातीच्या गणपतीची मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले आहे. याबाबत जनसामान्यामध्ये जनजागृती व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यशाळा जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वत: शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. मूर्ती तयार करताना एकाग्र होऊन जिल्हाधिकारी हे मूर्ती तयार करण्यात रमले व त्यांच्या हाताने मातीतून सुबक गणेशाची प्रतिमा निर्माण झाली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी हे जनतेचे मार्गदर्शक, पथदर्शक असतात त्यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले. त्यानुसार आज शाडू मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. देवाला मनोरंजनाचा विषय न करता श्रध्दा, विश्वास व उपासनेचा विषय करावा, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, माझी मूर्ती मोठी किंवा तुझी छोटी हा वादाचा विषय न करता श्रध्दाभाव ठेऊन गणेश स्थापना करावी.

यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आदीसह कर्मचारी उपस्थ‍ित होते. तसेच यावेळी मुख्य प्रशिक्षक शरद कोकाटे, संजय सेंगर, निलेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सुध्दा मातीपासून गणेश मूर्ती तयार केल्या. येत्या गणेश उत्सवात या मूर्त्यां स्थापन करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला.