राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उद्योगांच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण दिले जावे - सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उद्योगांच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षण दिले जावे, प्रत्येक संस्था किमान पाच उद्योग समुहांशी संलग्न करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण मिळेल यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत,अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

काल कौशल्य विकास आणि कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मॉडेल आय.टी.आय. संदर्भातील सादरीकरण केले त्यावेळी श्री.मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान सचिव लेखा व कोषागारे श्रीमती वंदना कृष्णा, संचालक तंत्रशिक्षण अ.म.जाधव यांच्यासह कौशल्य विकास विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मॉडेल आय.टी.आय. प्रकल्पासाठी पथदर्शी स्वरूपात लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आय.टी.आय.ची निवड करण्यात आली असल्याचे श्री.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी या दोन जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला आय.एस.ओ २९९९० करण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरु करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

व्हर्च्युअल क्लासरूम, वायफाय कॅम्पस, व्हिडिओ कॉन्फरंसिंग, स्मार्ट क्लासरुम सारख्या संकल्पना राबवितांना एनआयसीची मदत घेण्यात यावी व एकाचवेळी या दोन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य शहरांमधील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल अशी व्यवस्था विकसित करावी अशा सूचना देऊन श्री.मुनगंटीवार म्हणाले की, या दोन जिल्ह्याच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील रिक्त पदे पूर्ण भरण्यात यावीत तसेच व्हर्च्युअल क्लासरुमचा एक निश्चित आराखडा तयार करून त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. जर्मनीमध्ये तंत्रशिक्षणाचे एक वेगळे आणि उत्तम मॉडेल उपयोगात आणले जाते, त्याचा अभ्यास करून डिजीट मानक मिळवण्यासाठी या दोन जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काय उणिवा किंवा कमतरता आहेत यासंबंधीचे सविस्तर सादरीकरण करण्यात यावे, असेही ते म्हणाले. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील यंत्रसामुग्रीचे मुल्यांकन करतांना अत्याधुनिक सामग्रीच्या उपलब्धतेचा अभ्यास करण्यात यावा, अशी सूचनाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सामाजिक दायित्व निधीतून काही यंत्रसामग्री घेता येऊ शकेल, त्याची चाचपणी करण्यात यावी असे सांगून त्यांनी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्तम तंत्रशिक्षण मिळण्यासाठी जगातील उत्तम सल्लागार, संस्था याचा तपशील एकत्र करून अभ्यास करण्यात यावा असेही सांगितले.

आय.टी.आय. शी संलग्न इंडस्ट्री व्यवस्थित परफॉर्म करत नसेल तर दुसऱ्या इंडस्ट्रीशी त्या संलग्न करण्यात याव्यात असे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या संशोधनावर भर देण्याची तसेच औद्योगिक पेटंटची संकल्पना रुजविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातील कल्पकतेला चालना देण्यासाठी असे काम होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.