जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
 
ॲटोमाईझ्ड सोलर बेस ठिबक प्रणाली देशभरात कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल

कोल्हापूर : 
शेतीचे उत्पादन वाढून जोपर्यंत उत्पनात वाढ होत नाही तो पर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे सध्याचे चित्र पालटून जिल्ह्यातील शेती विकास देशात अधोरेखित व्हावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्,न  केले जातील यामध्ये ठिबक सिंचनाला प्राधान्य राहील. जैन इरिगेशनने विकसित केलेली ॲटोमाईझ सोलार बेस ठिबक प्रणाली कागलमध्ये 150 एकरावर राबविण्यात येणार असून राज्य आणि देशासाठी हा प्रयोग मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

रेसिडेन्सी क्लब येथे शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या विविध विषयावर सादरीकरण व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मार्गदर्शन करताना पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कणेरी मठाचे स्वामी काडसिध्देश्वर, जैन इरिगेशनचे अभय जैन, गोकुळचे संचालक बाबा देसाई, केळी तज्ञ के.बी.पाटील, अभिजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन भरघोस वाढविता येणे शक्य आहे. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. जैन इरिगेशनकडील ॲटोमाईझ सोलार बेस ठिबक प्रणालीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. उपलब्ध असणारे पाणी नियोजनबध्द पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. ठिबकच्या माध्यमातून खते आणि किटकनाशकेही देता येतात. त्यामुळे विजेशिवाय चालणारी ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपकारक आहे. ठिबक प्रणालीला उत्तेजन देण्यासाठी ती एकरी 50 हजार रुपये खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी उद्योजकतातील मोठमोठ्या कंपन्यांचा सीएसआर मिळविण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटण्यासाठी उपलब्ध जमिनीवर उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून यापुढे कृषी विभागाच्या यंत्रणांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. उत्पादन वाढले की शेतकरी श्रीमंत होतो त्यासाठी शेतकऱ्यांचे समूह करण्यात येतील. याचीच सुरुवात म्हणून पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा गट करुन 150 एकरावर महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा ग्रुप ऑटो माईझ सोलर बेस ठिबक प्रकल्प सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात किमान असे 25 समूह तयार करण्यात यावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतीतील उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग जिल्ह्यात करण्यात येत असून दारवाड, मालेगाव, खानापूर याठिकाणी नैसर्गिक किटकनाशकांचा प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतीत प्रगती झाल्याशिवाय देशाचा जीडीपी वाढणार नाही. सकल उत्पन्नात शेतीचा 9 टक्के वाटा आहे मात्र यावर 70 टक्के लोक अवलंबित आहेत हे प्रमाण व्यस्थ आहे. त्यामुळे आर्थिक ताणाताण होते ती दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच पण व्यक्तीगत स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यामुळे विकासासाठी राजकारण दूर ठेऊन व्यक्तीगत स्तरावरही प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

अभय जैन यावेळी म्हणाले, प्रत्येकाने मला काय पाहिजे याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. शेतीतील पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा प्रथम ध्यास घ्यावा. म्हणजे त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये निश्चित यश मिळेल. बंदिस्त पाईप लाईनद्वारेच पाणी उपसा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपसा पध्दतीमुळे पाणी वाया जाणार नाही व पाट पद्धतीने लागणाऱ्या पाण्यापेक्षा कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल. यावेळी त्यांनी कर्नाटकातील रामथल येथे ठिबक सिंचनाचा प्रकल्प 25 हजार हेक्टर जमिनीवर राबविण्यात येत असून ही सर्व पूर्वी कोरडवाहू असणारी शेती आता बागायती क्षेत्र बनले आहे. अशाच पध्दतीने महाराष्ट्रातही काम करता येणे शक्य आहे.

केळी पिकाचे तज्ञ व केळी उत्पादक जळगावचे के.बी.पाटील यांनी उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर शेतील विज्ञान समजून काम केले पाहिजे. पिकाच्या आवश्यकतेनुसार आणि वेळेनुसार पिकाचे व्यवस्थापन केले तर उत्पादन दुप्पटीचे स्वप्न निश्चित पुर्ण करणे शक्य आहे. तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते कृषी क्षेत्रही याला अपवाद नाही, असे सांगितले. यावेळी त्यांनी टिशू कच्लर केळी, टिशू कच्लर डाळिंब, अल्ट्राहाय डेन्सीपी हंबा, पेरु, ऊस आदी पिकांबाबत माहिती दिली. याबरोबरच हवामानातील बदल, तापमान वाढ, पाणी, जमिनीची सुपिक्ता, अन्न घटकाची उपलब्धता यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. शेती उद्योगाला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

अभिजित जोशी यांनी उपसा ठिबक सिंचन जैन इरिगेशनची एकात्मिक प्रणाली, ॲटोमॅटीक इरिगेशन यंत्रणा यांच्याबाबत सादरीकरण केले. यावेळी विविध प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.