जिल्हयात आठ वस्त्यावर पोलीसांची कारवाई, दागीने जप्त  • उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलीस व बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील आठ वस्त्यांवर कोंबिंग आॅपरेशन केले़ यात कळंब तालुक्यातील भोगा वस्तीवरील एका घरात चांदीचे दागिने, मोबाईल, घड्याळ जप्त करण्यात आले़ तर इतर ठिकाणाहून पाच संशयित वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत़
    मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोड्या, दुकानफोड्यांचे सत्र सुरू आहे़ सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांचे आव्हान उभा राहिले आहे़ चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांनी विविध प्रकारे कारवाई सुरू केली आहे़
    याच धर्तीवर कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद येथील स्थागुशा, बीड येथील स्थागुशा, कळंब पोलीस व इतर पथकांनी जिल्ह्यातील पाच वस्त्यांवर धडक कारवाई केली़ भोगा वस्तीवरील एका घरात चांदीचे भांडे, चांदीचे दागिने, सात मोबाईल, तीन घड्याळे, रोख ५७०० रूपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर इतर ठिकाणाहून पाच संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली असून, या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलीस करीत आहेत़ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत़