जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घ्यावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उस्मानाबाद : 'मागेल त्याला शेततळे' ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बालाजी चौधरी या शेतकऱ्याने शासनाच्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेऊन शेतीत केलेल्या प्रगतीची इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पार्डी (जि. उस्मानाबाद) येथे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण कामाचा धनादेश लाभार्थी शेतकरी श्री. बालाजी चौधरी यांना प्रदान करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. धनादेश वाटपानंतर मुख्यमंत्री महोदयांनी शेततळ्याची पाहणी केली.

यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे सहपालकमंत्री महादेव जानकर, कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजितसिंग ठाकूर, खासदार रवींद्र गायकवाड, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी आर.व्ही.गमे आदी उपस्थित होते.

'मागेल त्याला शेततळे' योजनेअंतर्गत वाशी तालुक्यामध्ये 273 शेततळ्यांचा लक्षांक असून 338 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 325 अर्जांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 145 शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. 165 शेततळ्याचे काम सुरू आहे.