शेतकरी समृध्द झाला तर राष्ट्रही समृध्द होईल - सहकार मंत्री सुभाष देशमुख


उस्मानाबाद : हे शासन शेतकऱ्यांचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, हे फक्त मीच नव्हे तर राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बोलत आहेत, आणि म्हणून आम्हा सर्वांचा असा विश्वास आहे की, शेतकरी समृध्द झाला तर राष्ट्रही समृध्द होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, केंद्र शासनाच्या 3 वर्षपूर्तीच्या तर राज्य शासनाच्या अडीच वर्षपूर्तीच्या कामगिरीबद्दल सर्वसामान्यांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘शिवार संवाद’ हे अभियान गावागावात राबविले जात आहे. त्यानिमित्ताने तुळजापूर तालुक्यातील शहापूर, खुदावाडी, चिकुंद्रा या गावात थेट शेतातच शेतकऱ्यांशी ‘शिवार संवाद’ साधला जात आहे, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, सहाय्यक निबंधक श्री. शिंदे, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड.अनिल काळे, विजय शिंगाडे, सत्यवान सुरवसे,सुहास साळुंखे हे उपस्थित होते.

श्री देशमुख म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मनापासून काम करतेय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेण्यासाठी ‘शिवार संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना बोलण्याची संधी देण्याचे काम हे शासन करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये जाऊन थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचे पारदर्शी काम हे शासन करीत आहे. शेतकरी समृध्द झाला तर राष्ट्रही समृध्द होईल यासाठी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना आवाहन केले आहे की, ‘सबका साथ सबका विकास’ यासाठी देशातील सर्व जनतेला बरोबर घेऊन या देशाला समृध्द राष्ट्र बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आणि मंत्रीमंडळातील त्यांचे सर्व सहकारी देखील लोकसहभागातून राज्याचा विकास साधण्याचा प्रामाणिक अथक प्रयत्न करीत आहेत.

यावेळी तुळजापूर तालुक्यातील शहापूरचे शेतकरी मारूती तांदळे, खुदावाडीचे शेतकरी महादेव सालगे चिकुंद्राचे शेतकरी दादा जाधवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.