विचारांनी मॉडर्न होणे महत्त्वाचे - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे
उस्मानाबाद : नुसत्या कपड्यांनी मॉडर्न न होता,विचारांनी मॉडर्न होणे महत्त्वाचे आहे. विचारांची समानता बंधुता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद, महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, परीविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड.शरद जाधवर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपिका जहागीरदार, स्त्री रोगतज्ञ डॉ.वसुदा दापके-देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले, महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँ साहेब,आहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक कर्तबगार महिलांचा आदर्श घ्यावा, आजच्या काळातील महिलांनी आताच्या आणि पूर्वीच्या काळातील परिस्थितीचा अभ्यास करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करायला हवे. महिलांचे लैंगिक शोषण हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. महिलांनी नुसत्या कपड्यांनी मॉडर्न न होता, विचारांनी मॉडर्न होणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज व्यक्त केली. मुलींच्या जन्माचे महत्त्व सांगून महिलांनी खंबीर होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली घाडगे यावेळी म्हणाल्या, काही महिलांची कामे प्रशंसनीय आहेत. ज्यावेळी महिला दिन बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले असे म्हणता येईल.

यावेळी महिला बचत गटाला कर्ज वाटप व उल्लेखणीय काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कोठावले, भाग्यश्री लोंढे तर प्रास्ताविक ग्रामीन जीवनोन्नती अभियान संचालिका डॉ.रुपाली सातपुते यांनी केले. महिला अधिकारी-कर्मचारी, बचत गटांच्या महिला यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.