पालक सचिव महेश पाठक यांनी घेतली आढावा बैठक

उस्मानाबाद : प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या़ सूचना दिल्या.

या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी श्री.आयुषप्रसाद, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, प्रभोदय मुळे, सचिन बारावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मुकणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

आढावा बैठकीत प्रारंभी पालक सचिव महेश पाठ‍क यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा व उपयुक्त जलसाठा, माहे जून 2016 ते 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा, टंचाई कृती आराखडे, महसूल वसुली, पीक कर्ज वाटप, खरीप 2016 पीक कर्ज वाटप, रब्बी 2016 पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन, खरीप पीक विमा भरणा, खरीप हंगाम हवामान व पिक परिस्थिती अहवाल, सन 2016-17 मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्या, बळीराजा चेतना अभियानांतर्गत वितरीत करण्यात आलेला निधी, जिल्ह्यातील निरीक्षण विहीरीतील पाणी पातळीचा तालुकानिहाय आढावा, ई-फेरफार, जिल्ह्यातील आधार नोंदणीबाबतची सद्य:स्थिती इत्यादी विषयांचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.
पुरवठा विभागाचा आढावा
जिल्ह्याची आढावा बैठक झाल्यानंतर पालक सचिव महेश पाठक यांनी पुरवठा विभागाच्या ई-पीओएस या ऑनलाईन प्रणालीच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, औरंगाबादचे पुरवठा अधिकारी भारत कदम, जालन्याचे पुरवठा अधिकारी राजू नंदकर, परभणीचे पुरवठा अधिकारी श्री.बोधवड, हिंगोलीचे पुरवठा अधिकारी ए.के. दुवाळकर, नांदेडचे पुरवठा अधिकारी एन.टी. देवकुळे, बीडचे श्री.शिंगटे आणि लातूर जिल्ह्याचे पूरवठा अधिकारी प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बायोमेट्रीक पद्धतीने धान्य वितरीत करण्यासाठी ई-पीओएस मशिनचा वापर करण्यात येणार आहे. ही ऑनलाईन धान्य पूरवठा प्रणाली मराठवाड्यात तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात लातूर व नांदेड, दुसऱ्या टप्प्यात जालना, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा तर तिसऱ्या टप्प्यात परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून विभागातील सर्व जिल्ह्यात प्रत्येकी दोन रास्तभाव दुकानदार यांना प्रायोगिक तत्वावर ई-पीओएस ही मशीन धान्य वितरणासाठी देण्यात आली आहे . शिधापत्रिकेमध्ये असणारा फरक 6 मार्च पर्यंत जुळवून घेणे, तांत्रिक अधिकाऱ्यांचे ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण पूर्ण करणे, ई-पीओएस कार्यान्वित करताना निदर्शनास येणाऱ्या अडचणी दूर करणे, यामध्ये प्रत्यक्ष कार्यरत रास्तभाव दुकानांची संख्या, एकूण शिधापत्रिकांची संख्या, शिधापत्रिकांवरील सदस्य संख्या इत्यादींचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना या आढावा बैठकीत सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना यावेळी पालक सचिव महोदयांनी दिल्या.