डिजीधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये लक्षणीय प्रतिसादउस्मानाबाद : कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र डिजीधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला तर, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब यांनी दुसरा व रामकृष्ण परमहंस विद्यालयाने यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.

कॅशलेस व्यवहाराविषयी सर्वात जास्त जनजागृती सत्रे आयोजित केल्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास विशेष पारितोषिक देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांना डिजीटल व्यवहाराच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन, नागरिकांची भिम अॅप/युपी आय वर नाव नोंदणी करणे, दुकानदारांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहाय्य करणे यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले होते.

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत नागरिक, दुकानदार यांच्यात जनजागृती करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 476 डिजीदुतामार्फत 4 हजार 22 नागरिकांना कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृती करण्यात आली. 32 नवीन बँक खाते उघडण्यात आले. तर 25 वॉलेट रजिस्ट्रेशन, आठ दुकाने कॅशलेस, 54 युपीआय वर नाव नोंदणी करण्यात आली.

यासाठी जिल्ह्यातील 24 संस्थांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेमध्ये 15 ते 20 युवकांची एक याप्रमाणे दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या प्रशिक्षणात तयार होणाऱ्या टीमला मंत्रालयातील तीन मुख्य ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विविध बँकाचे ऑनलाईन व्यवहार, शासनाचे भिम ॲप व इतर कॅशलेस व्यवहारांबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे व प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.