
उस्मानाबाद : महिला बचतगटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच घटाकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर,उमेद,कृषी विभाग,आत्मा,स्वयंशिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केद्र, तुळजापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. चोले, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक ढवण, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.सचिन सूर्यवंशी, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.विलास टाकणखार, प्रा.अपेक्षा कसबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ.वेंकटेश्वरलु म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा व मराठवाड्यातील महिला बचतगट विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सक्षम आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनेतून पाठबळही मिळत आहे. मात्र बचत गटानी निर्माण केलेल्या मालाला योग्य भाव (मार्केटिंग) मिळण्यासाठी योग्य बाजारपेठेची गरज आहे. ही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन मोठ-मोठ्या कंपनीच्या वस्तू न खरेदी करता, महिला गटांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात, जेणे करून त्यांना मार्केटिंगची अडचण येणार नाही. यावेळी डॉ.ढवण म्हणाले की, वैचारिक सक्षमिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली तर आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. यशस्वी महिला गटांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विवम घनकचरा व्यवस्थापन, औरंगाबादच्या निर्मला कांदलगावकर, विद्यापीठ कार्यकारणी सदस्य आनंद चोंदे, शास्त्रज्ञ डॉ.अप्पाजी चारी, जिल्हा परिषदचे स्वच्छ भारत मिशनचे रमाकांत गायकवाड व महिला शेतकरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर भाषण केले. या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला बचतगटांनी बनविलेल्या विविध वस्तूचे दहा स्टॉल लावण्यात आले होते. वस्तू खरेदीसाठी तुळजापूर व परिसरातील महिलांनी या स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व उमेदचे तालुका समन्वयक संदीप दाभाडे यांनी केले,तर सूत्रसंचालन व आभार रमेश पेठे यांनी केले. |