
राज्याचे बजेट सादर मुंबई : शेतीला गुंतवणुकीचे क्षेत्र बनवून २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा संकल्प असल्याचे तसेच राज्याच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात त्यादृष्टीने शेतकरी हिताच्या अनेक योजना जाहीर केल्या असल्याचे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज राज्याचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प श्री.मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देताना समाजातील दुर्बल वंचित घटकास तसेच कृषी क्षेत्रास केंद्रस्थानी ठेऊन हा अर्थसंकल्प तयार केला असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, गेल्या दोन वर्षातील चांगल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचा २०१४ साली असलेला ५.४ टक्क्यांचा विकासदर सन २०१६-१७ साली ९.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचा विकास दर पुढच्या वर्षी दोन अंकी करण्याचा संकल्प आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेतून शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज फेडायचे झाले तर कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल व शाश्वत शेती व्यवस्था न झाल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्र शासनाला मदतीची विनंती केली असल्याचे सांगताना राज्य शासन या योजनेतील आपला वाटा उचलेल तसेच ही योजना केवळ जुन्या थकित कर्जासाठीच असेल हेही अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. |