रब्बी हंगामातील पीकविम्याबाबत चर्चा

उस्मानाबाद - तालुक्‍यात रब्बी 2015 हंगामात बनावट पीककापणी प्रयोग केल्याचे उघडकीस आले आहे. या हंगामात जास्तीचे उत्पादन दाखविल्याने शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मंगळवारी  प्रसिद्धिपत्रक दिले. आमदार  पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, तहसीलदार सुजित नरहरे, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायकांसोबत बैठक घेतली. यात हरभरा पीक कापणी प्रयोगाबाबत चर्चा झाली. पीककापणी प्रयोग महसूल, कृषी व जिल्हा परिषदेकडून करण्यात येतात. वाघोली ता. उस्मानाबाद येथील पीककापणी अहवालावर कोणाचीच स्वाक्षरी नाही. तसेच खामगाव व सकनेवाडी येथील अहवालावर खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यातील पीककापणी प्रयोग बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याने तालुक्‍यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे नमूद आहे.