उत्तम कायदा सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्र संरक्षण व हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचे हब बनेल- मनोहर पर्रिकर

बातमी


‘डिफेन्स अँड एरोस्पेस-मेक विथ महाराष्ट्र’ परिषदेत महाराष्ट्राच्या विशेष धोरणाचा मसुदा सादर
संरक्षण निर्मिती उत्पादनासाठी ‘मेक विथ महाराष्ट्र’- मुख्यमंत्री

मुंबई : 
महाराष्ट्रात संरक्षणाशी संबंधित अनेक संस्था तसेच खाजगी उद्योग आहेत. येथे उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असून राज्यात कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांना सुरक्षित वातावरण मिळत असल्याने येत्या काळात महाराष्ट्र हे संरक्षण व हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचे हब बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ‘डिफेन्स अँड एरोस्पेस-मेक विथ महाराष्ट्र’ या परिषदेत श्री. पर्रिकर बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुरिन रंजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रधान सचिव संजय सेठी आदी यावेळी उपस्थित होते.

या परिषदेत भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांच्यासह देश-विदेशातील हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रातील उद्योजक, स्वीडन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, ब्रिटन आदी विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

श्री. पर्रिकर म्हणाले की, मेक इन इंडियाअंतर्गत देशात संरक्षण उत्पादन निर्मितीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिनेही देशांतर्गत उत्पादनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, अंबरनाथ, पुणे आदी ठिकाणी संरक्षण विभागाच्या ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. तसेच संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी सुयोग्य वातावरण आहे. त्याशिवाय राज्यातील शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा, कुशल मनुष्यबळ आणि उत्पादनाचा कमी खर्च यामुळेही या क्षेत्रातील उद्योगाना येथे वाढीसाठी वाव आहे. त्यामुळेच बंगळुरु व हैदराबादनंतर महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्राचे मोठे केंद्र होईल.

संरक्षण निर्मिती उत्पादनासाठी ‘मेक विथ महाराष्ट्र’- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी अतिशय सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्योगांसाठी स्नेहपूर्ण वातावरण, विविध प्रोत्साहनपर योजना, वाद निवारणासाठी आंतरराष्ट्रीय वाद निवारण केंद्राची स्थापना, कुशल मनुष्यबळ यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. संरक्षण व हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्राच्या उद्योगांसाठीही विशेष धोरणांतर्गत सवलती देण्यात येणार आहेत.

राज्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, अंबरनाथ या भागात केंद्राच्या संरक्षण विभागाशी संबंधित उद्योग आहेत. त्याचबरोबर अनेक मोठ्या खाजगी कंपन्याही राज्यात आहेत. यामुळे या क्षेत्रासाठी सुयोग्य वातावरण निर्मिती झाली आहे. जागेची उपलब्धता, विविध सवलती आदी विविध उपायाद्वारे राज्य शासन या क्षेत्रातील कंपन्यांचे राज्यात स्वागत करत आहे. उद्योगांच्या गरजेनुसार धोरण आखल्यामुळे त्यांच्यासोबत राज्य शासन काम करणार आहे. त्यामुळे आम्ही या उद्योगांना ‘मेक इन महाराष्ट्र’ ऐवजी ‘मेक विथ महाराष्ट्र’ अशी साद घालत आहोत. यातून महाराष्ट्राला ‘संरक्षण व हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्राचे हब’ बनविण्यात येणार आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी आपली मते मांडली. श्री. चंद्रा यांनी राज्याने आखलेल्या संरक्षण व हवाई संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठीच्या विशेष धोरणाचे सादरीकरण केले.