बंदीजनांनी आदर्श नागरिक होण्याचा निर्धार करावा – डॉ. विजय सतबीर सिंग


मुंबई : कारागृहांना सुधारगृह समजून येथून बाहेर पडताना आपण आदर्श नागरिक म्हणून जीवन जगू असा निर्धार बंदीजनांनी करावा, असे मनोगत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांनी आज व्यक्त केले. भायखळा कारागृहात नयन फाऊंडेशन फॉर परफॉरमिंग आर्ट या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पुरुष व महिला बंदीजनांच्या मनोरंजनासाठी आयोजित संगीत कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डॉ. सिंग पुढे म्हणाले की, बंदीजनांनी कायमचे बंदी जीवन न जगता येथून बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहून आणि आदर्श नागरिक म्हणून आपल्या कुटूंबासह जीवन व्यतीत करावे, तसेच राष्ट्रउभारणीच्या कामात सहभागी व्हावे.

याप्रसंगी बोलताना माहिती संचालक देवेंद्र भुजबळ म्हणाले की, कारागृहातील बंदीजनांनी कारागृह म्हणजे आपल्याकडून झालेल्या चुका सुधारण्याची संधी समजून येथील कालावधीत विविध कला, व्यवसाय अवगत करून सन्माननीय जीवन जगण्यासाठी प्रेरीत व्हावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भायखळा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांनी तर आभार प्रदर्शन वरीष्ठ तुरूंग अधिकारी तानाजी घरबुडवे यांनी केले. नयन फाऊंडेशन फॉर परफॉरमिंग आर्ट या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या अंध गायक, गायिका वादकांच्या संगीत कार्यक्रमामुळे जवळपास तीन तास बंदीजनांच्या चेहऱ्यावर हसु फुलले. यावेळी ऑक्टोपॅडवर शिवाजी भोसाडे, ढोलकीवर जयेश बनिया तर गायिका सुजाता चव्हाण, गायक सुहास कर्निक, विशाल कटारिया यांनी सहभाग घेतला.

प्रख्यात गायक सुनील नायर, मिमिक्री कलाकार राजदीप यांनीही सादरीकरण केले. अंध सूत्रसंचालक बुद्धघोष यांनी बहारदारपणे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात बंदीजनांनीही आपली कला सादर केली.

याप्रसंगी समाजसेविका फिरोजा अब्राहम (अभिनेता जॉन अब्राहम यांच्या मातोश्री),बिना भगत, नयन फाऊंडेशन फॉर परफॉरमिंग आर्टच्या संयोजिका नयना कुट्टपन, एअर इंडियाचे सहायक व्यवस्थापक अतुल पंचभाई, केईएमचे डीन डॉ. रत्नेश शिंदे, शास्त्रज्ञ श्रीमती निकम आदी मान्यवर उपस्थित होते.