मुख्य निवडणूक आयुक्तांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

बातमी


नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रमात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर राज्य निवडणूक आयोगाने भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्य मुख्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी व्हीडियो कॉन्फरसींगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कुलगुरुंच्या दालनातून श्री.सहारिया यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातंर्गंत येणाऱ्या नागपूर येथील मोहता सायन्स कॉलेज, रामदेवबाबा इंजिनीअरींग कॉलेज, हिस्लॉप आणि धरमपेठ सायन्स कॉलेज, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील 11 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत मतदार जागृतीसंदर्भत त्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही मतदान करण्यासाठी श्री. सहारीया यांच्या आवाहानाला प्रतिसाद दिला.

यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, कुलगुरु डॉ.सिध्दार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, रजिस्ट्रार डॉ.पुरणचंद्र मेश्राम, बीसीयुडीचे संचालक डॉ.डी.के.अग्रवाल, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ.निहाल शेख आणि माहिती भांडारच्या डॉ.वीणा प्रकाशे यांची उपस्थिती होती.

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवावर्गाने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी व्हावे. तसेच आपले कुटुंब, शेजारी आणि परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

त्यासाठी सोशल मीडिया, पथनाट्ये, रॅली, मानवी साखळी आणि महाविद्यालयांच्या युवा महोत्सव अशा विविध माध्यमांतून जनतेमध्ये जनजागृती करावी. विद्यमान स्थितीत देशाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी मतदानात झालेली घट ही लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी चिंतनीय बाब असल्याचे सांगितले. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांचा मतदान प्रक्रियेत जास्त सहभाग असतो. त्यामुळे शहरी भागातील नागरिक हे सुशिक्षित असूनही सहभागी होत नाहीत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरजही व्यक्त केली.

यापूर्वी राज्यातील पुणे, नाशिक आणि अमरावती विद्यापीठामधील 700 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या निर्भयपणे तसेच मोकळ्या वातावरणात पार पाडता याव्यात, त्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यानी कल्पक व नवनवीन योजना तयार करुन मतदानाची टक्केवारी जास्तीत – जास्त वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी यावेळी केले.