प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नउस्मानाबाद : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. येथील पोलीस संचलन मैदानावर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दीपाली घाटगे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाचे महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल,जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, दंगल नियंत्रण पथक आदी पथकांच्या संचलनाची मानवंदना डॉ.नारनवरे यांनी स्वीकारली.

संचलनात विविध विभागांचे आकर्षक चित्ररथही सहभागी झाले होते. संबंधित विभागांच्या योजनांची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. यात जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत मिशन कक्ष, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, अग्निशमन, बॉम्बशोधक, पोलीस विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम पथक,आपत्ती व्यवस्थापन पथक, वन विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुसज्ज रुग्णवाहिका, महिला छेडछाडविरोधी पथक, होमगार्डस्, स्काऊट गाईड्स आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, विविध मान्यवर, उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते नक्षलग्रस्त विभागात दाखविलेल्या कठीण व खडतर कामगिरीबद्दल सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र आनंदराव बनसोडे, सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती विरयानी कदम, येरमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षक विनोद बापुराव चव्हाण यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर-2015 यासाठी निवड झालेल्या बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या कु.पद्मजा लक्ष्मण मुळे, कु.श्वेता दत्तात्रय मुंडे आणि कु.भारती नंदकुमार मानाळे या विद्यार्थीनींचाही जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या समारंभाच्या शेवटी यमगरवाडी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, ग्रीनलँड हायस्कूल व लिटलस्टार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण संपन्न
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या प्रारंभी प्रथम पोलीस विभागाने सलामी दिली. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपयांत्रिकी विभाग, उस्मानाबाद कार्यालयातील सेवक श्री.परिमल यांनी राष्ट्र भक्तीपर गीत गाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची मने जिंकली या ध्वजारोहण कार्यक्रमास प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, विभागीय वन अधिकारी श्री.सातेलीकर, सहायक निबंधक श्री.शिंदे, उप विभागीय कृषी अधिकारी श्री.बिराजदार तसेच सहकार, वन विभाग, जलसंधारण, नेहरु युवा केंद्र व अन्य विभागाचे अधिकारी -कर्मचारीमोठया संख्येने उपस्थित होते.