जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांनी घेतली आढावा बैठक
उस्मानाबाद : प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या़ सूचना दिल्या .

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आढावा बैठकीत प्रारंभी पालक सचिव महेश पाठक यांनी जिल्ह्यातील खरीप 2015 मधील नुकसानीबाबत, पीक विमा योजनेत समाविष्ट असलेल्या व नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती, खरीप व रब्बी 2016 पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन, खरीप विमा वाटप, रब्बी हंगाम साप्ताहिक पेरणी अहवाल, हवामान व पीक परिस्थिती, जिल्ह्यातील आधार नोंदणीबाबतची सद्य:स्थिती इत्यादीबाबतची माहिती संबंधितांकडून घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. याबरोबरच जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान, पीक विमा योजना, आरोग्य पत्रिका, निश्चलनीकरण व कॅशलेस इकॉनॉमी, आधार कार्ड, सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

यानंतर पालक सचिव महेश पाठक यांनी निश्चलणीकरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, बँकेतून काढण्यात येणाऱ्या रोख रक्कमेबाबतच्या मर्यादेत करण्यात आलेली वाढ आणि तद्नुषंगिक इतर बाबींची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर यांच्याकडून घेतली. तसेच या बैठकीनंतर पालक सचिव महेश पाठक यांनी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली.