महाराष्ट्र पोलीस नक्षलवाद, दहशतवादाचा सामना करीत खेळातही अग्रेसर- राज्यपाल

बातमी


औरंगाबाद : नक्षलवाद व दहशतवादाशी सामना करीत राज्यातील पोलीस खेळामध्येसुद्धा अग्रेसर असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळामध्ये यश प्राप्त करत आहेत. ही बाब महाराष्ट्र पोलीस दलास व महाराष्ट्रास भूषणावह आहे. पोलिसांनी खेळामध्ये आणखी नैपुण्य प्राप्त करून राज्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

29 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते. यावेळी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, विभागीय महसूल आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे देशातील एक शिस्तप्रिय राज्य असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिकरणाला मदत होत आहे. या स्पर्धेतून पोलीस व जनता यांच्यात सौजन्यपूर्ण वातावरण निर्मिती होत असते. तसे पाहिले तर पोलिसांचे काम फार अवघड असून वर्षभर 24 तास ते जनतेला सेवा देत असतात. अशा या पोलिसांच्या जीवनातील खेळ ही स्वागतार्य अशी एक बाब आहे. या स्पर्धेत 2500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात 671 पोलीस अधिकारी - कर्मचारी महिलांचाही समावेश होता. यावरून पोलिसातील महिलाही पुरूषांपेक्षा कमी नाहीत, त्याही आपले दैनंदिन काम सांभाळून खेळाला प्राधान्य देतात. आपले आरोग्य व पोलिसांतील आपले काम हे उत्तमपणे सांभाळतात, हे सिद्ध होते. त्यामुळे पोलिसातील खेळाडू महिलांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गारही राज्यपाल श्री. राव यांनी काढले.

राज्यातील पोलिसांच्या समोर नव्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेली सायबर गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचारामुळे कामाचा ताण वाढला आहे. पोलिसांनी सायबर गुन्ह्यासंबंधातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून या गुन्हेगारीला आळा घालण्याचे तंत्र अवगत करावे. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांना जनतेने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

श्री.बागडे म्हणाले, पोलिसांनी स्वयंशिस्त बाळगून ती जनमानसात रूजविल्यास समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊन पोलिसांवरील वाढणारा ताण कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेतून पोलिसांना तणाव मुक्त होण्यास मदत होऊन त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते.

श्री. माथूर म्हणाले, या स्पर्धेमध्ये आठ नवीन विक्रम नोंदवण्यात आले. अशा स्पर्धेमुळे पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होते. तसेच पोलिसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

श्रीमती त्यागी यांनी प्रास्ताविका या स्पर्धेत तेरा संघ व जवळपास 2500 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला. यावर्षी या स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्यात आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या स्पर्धेत पुरूष सर्वसाधारण विजेतेपद मुंबई शहर पोलीस, व्दितीय राज्य राखीव पोलीस बल तर तृतीय विजेतेपद कोल्हापूर परिक्षेत्रास मिळाले. महिला सर्वसाधारण विजेतेपद प्रथम मुंबई शहर, व्दितीय कोल्हापूर परिक्षेत्र आणि तृतिय प्रशिक्षण संचालनालयास असे जाहीर करण्यात आले. तसेच बेस्ट महिला खेळाडू अॅथलॅटिक म्हणून जयश्री बोरगे यांना स्कुटी तर बेस्ट पुरूष ॲथलॅटिक म्हणून बिपीन ढवळे यांना मोटार सायकल भेट देण्यात आली.