मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीवर भर द्या- जे.एस.सहारिया

बातमी


नाशिक : येत्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जागृतीवर अधिक भर देण्यात यावा आणि नि:पक्ष पारदर्शक, मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य घेण्यात यावे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त एकनाथ डवले, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, नाशिकचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे, नाशिक मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जळगाव जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अहमदनगर जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, जळगांव पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अहमदनगरचे पोलिस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडे, अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र दिनवडे, उपायुकत सुकदेव बनकर आदी उपस्थित होते.

श्री.सहारिया म्हणाले, बँकानी खातेदारांना संदेशाच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत आवाहन करावे. सहकारी संस्थांनीदेखील सभासदांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणुकीसाठी साधने, वाहने, साहित्य, कर्मचारी याबाबत पुर्वतयारी लवकर पूर्ण करावी. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, वस्तु, मद्य याचा उपयोग होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. अशावेळी उमेदवार नव्या क्लुप्त्या उपयोगात आणण्याची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीने विविध पैलु लक्षात घेऊन नियोजन करण्यात यावे.

निर्भय वातावरणात मतदाराने मतदान करण्यासाठी बाहेर पडावे आणि लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढावा यादृष्टीने उपाय योजावेत, असे निर्देश त्यांनी दिले. मतदानाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होणार नाही याबाबत महावितरणाला आदेश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने यावर्षापासून काही सकारात्मक बदल केले आहेत. उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातील त्याचे शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्ता, दायित्वे, दोन वर्ष किंवा अधिक शिक्षा होऊ शकेल असे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, एक वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली असल्यास अशा प्रकरणांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी संक्षिप्त स्वरुपात वृत्तपत्रातून प्रायोगिक तत्वावर प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मतदान प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाऊ नये, असे करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. ‘सिटीझन ऑन पेट्रोल’ या मोबाईल ॲपद्वारे एखाद्या नागरिकास निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याचे आढळ्यास तो माहिती देऊ शकेल. दोन किलोमीटर परिसरातील निवडणुकीसाठी तैनात कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती तात्काळ पोहचेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

नाशिक महानगरपालिकेने जनजागृतीद्वारे मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र सर्व सुविधांनी युक्त असावे, अशी सुचनाही त्यांनी दिली. उत्पादन शुल्क विभाग, इन्कम टॅक्स, बँक आदी विविध विभागांना मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी त्यांच्या स्तरावर योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

श्री.चन्ने यांनी महापालिका निवडणुकीत दहा टक्के मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. उमेदवारांना विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी पद्धत अंमलात आणावी, असे त्यांनी सांगितले.