नोटाविरहित व्यवहारांचा उस्मानाबाद पॅटर्न
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य विकास दिनी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ई- बँकींग, मोबाईल बँकींग, पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस व्यवहार कसा करायचा याबाबत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते.

श्री. रायते म्हणाले की, रोखीने होणारे व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेची शाखा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सर्वप्रथम सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाईल. ज्या पालकांचे बँकेत खाते नसतील अशांची खाते बँकेत उघडली जातील. प्रत्येक शनिवारी म्हणजेच कौशल्य विकास दिनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षक ई-लर्निंगच्या माध्यमातून नेटबँकींग, मोबाईल बँकींग यासारख्या डिजिटल पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील, ज्यामध्ये नोटांची निर्मिती कशी झाली, नोटांचा इतिहास, प्लॅस्टिक मनी ही संकल्पना, एटीएम कार्डबाबत माहिती एटीएम कार्डची काळजी कशी घ्यायची, एटीएम कार्ड वापरण्याची पध्दत, एटीएम कार्डचे फायदे इत्यादींबाबतची माहिती विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चलनीकरणाबाबतची भिती निघून जाईल तसेच कॅशलेस पध्दतीबाबत जनजागृती होईल. याशिवाय प्रत्येक विद्यार्थी शाळेत दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती आपल्या पालकांना देतील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील ही निश्चलनीकरणाची व कॅशलेस व्यवहारांबाबतची भिती दूर होण्यास मदत होईल, असेही श्री.रायते यांनी सांगितले.

या बैठकीस विविध बँकांचे अधिकारी तसेच जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे श्री. रुकमे, शिक्षणाधिकारी (माध्य) ए.एम. उकिरडे आदी उपस्थित होते.