नवीन रोकडरहित अर्थ रचनेच्या संधीचा सहकारी पतसंस्थांनी स्वीकार करावा - जिल्हाधिकारी
उस्मानाबाद : केंद्र शासनाने जाहीर केलेली नोटबंदी व त्यावरील उपाययोजना म्हणून कॅशलेस व्यवहाराकडे होत असलेली वाटचाल याबाबत तर्कवितर्क न करता ही सहकारी पतसंस्थाना एक नवीन संधी असून या रोकडरहित अर्थ रचनेच्या नवीन संधीचा सर्वांनी स्वीकार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पवनराजे लोकसमृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. उस्मानाबाद च्या मुख्य शाखेत काल झालेल्या स्वाईप मशीनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना केले.

याप्रसंगी उस्मानाबादचे तहसीलदार सुजीत नरहिरे यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच पवनराजे मल्टीस्टेटचे चेअरमन डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, मातोश्री गयाई महिला पतसंस्थेचे चेअरमन श्री. आगरे, उस्मानाबाद जिल्हा महिला पतसंस्थाचे संचालक श्री. नागणे, प्रतिष्ठित व्यापारी श्री. मुन्ना खंडेरिया यांची उपस्थिती होती.

भ्रष्टाचार मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने नोटाबंदी व कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमातून उचललेले पाऊल पाहता ग्राहकांच्या हितासाठी व सुलभ बॅंकींग व्यवहारांसाठी स्वाईप मशीनचा पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचे चेअरमन डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत तातडीने पाठपुरावा करुन संस्थेच्या सर्व शाखांमध्ये स्वाईप मशिन्स उपलब्ध करुन देण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयास प्रशासनानेही पाठिंबा दर्शविला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते एटीएम कार्ड स्वाईप करुन डिजिटल व्यवहाराचे प्रात्यक्षिकही उपस्थिताना पाहावयास मिळाले. याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हातोहात पैशांचा व्यवहार करण्यापेक्षा फक्त मशीनद्वारे योग्य ती माहिती इनपूट करुन वेळ व श्रम वाचविणारे पैशांचे हस्तांतरण सर्वांना पाहावयास मिळाले. हे व्यवहार झाल्याची पोहोच ही मोबाईलवर संदेशाद्वारे मिळत असल्याची खात्रीही उपस्थिताना आली.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितलेल्या सहकारी पतसंस्था व सहकारी बॅंकींग क्षेत्राच्या अभ्यासपूर्ण माहितीने सारेच प्रभावित झाले. सर्वांनी या नवीन अर्थव्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. शासनाकडून अर्थधोरणांमध्ये सातत्याने बदल केले जात असताना याबाबत व्यर्थ ऊहापोह न करता विकासाची हिच संधी आहे, असे समजून सहकारी मल्टीस्टेट संस्था व पतसंस्थांनी शासनाच्या डिजिटल व्यवहारांच्या मोबाईल बॅंकींग, ई-वॉलेट, स्वाईप मशीन, एटीएम डेबीट कार्ड, युपीआय अॅप, इंटरनेट बॅंकींग इत्यादींचा अवलंब करावा, असे केल्यास मल्टीस्टेट संस्था व पतसंस्थांच्या व्यवहार वाढीस नक्कीच चालना मिळेल. जनहितासाठी होत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या अशा संस्थांना कायम पाठिंबा असेल.

याच पार्श्वभूमीवर पवनराजे मल्टीस्टेटने त्यांच्या शाखांमध्ये स्वाईप मशीन्स ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या असल्याचे तसेच या स्वाईप मशीनचा वापर मिनी एटीएम म्हणूनही करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट, रुपामाता मल्टीस्टेट, श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट, श्री समर्थ पतसंस्था, दिशा नागरी पतसंस्था, इक्विटास बॅंक लि. यांच्या प्रतिनिधींची तसेच शहरातील मान्यवर, ग्राहक व हितचिंतक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सरव्यवस्थापक श्री. प्रशांत सुलाखे, मुख्यालय प्रमुख श्री. मुखीम सिद्दिकी, मुख्य शाखा व्यवस्थापक श्री. हनुमंत भुतेकर, सुरज महाडिक आणि इतर सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.