उस्मानाबाद रिपोर्टर.. जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर अनाथ बालगोपाल समाजाचा आधारस्थंभ बनतील, असे मत पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या मैदानावर सोमवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आर्थिक मदत देण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, नगरसेवक सोमनाथ गुरव, जिजाऊ मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघ, मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष रोहित बागल, सौ. गोसावी, सामाजिक कार्यकर्ते रवी निंबाळकर, विक्रम पाटील, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णू इंगळे, ओंकार नायगावकर, आदी यावेळी उपस्थित होते.
ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर खर्या गरजूंचा शोध सुरू झाला. कोणाच्या आई-वडीलांनी लहानपणीच जगाचा निरोप घेतलेला. तर कोणाचे वडील बालपणीच देवाघरी गेलेली... आईने मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला... मुलेही मिळेल ती कामे करून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा आटोकाट प्रयत्न. यातूनच खर्या गरजूंची यादी तयार झाली. आर्थिक हालाखीने वास्तविक जगापासून कोसो दूर असलेल्या या चिमुकल्यांना अशा कठीण प्रसंगी सेवाभावी ट्रस्टने मदतीचा हात पुढे करताच अनेकांचे डोळे आनंद आश्रुंनी पाणावले. कोणाच्या चेहर्यावर मदत मिळाल्याचा आनंद... तर कोणाच्या चेहर्यावर हास्त पाहताच अनेकांना गहीवरून आले. दुष्काळ, नापिकी अशा प्रकारची संकटे अनेकांच्या वाट्याला येतात. तरीही न डगमगता शिक्षणाची गंगा सोबत घेऊन पुढे जाण्याचे कौशल्य मदत घेताना गरजूंच्या चेहर्यावर दिसून येत होती. १५ कुटुंबियांना प्रत्येकी दिड हजार रुपयांची आर्थिक मदत. वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी बँकेट मिळताच अनेक बालगोपालांच्या चेहर्यावर हास्य फुलले. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी स्वतः सर्व वस्तु घेऊन कुटुंबियांसह शहरात आले होते.