पुण्याला स्टार्टअपची राजधानी करण्यासाठी राज्य शासन धोरण आखणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस इकॉनॉमी तयार करण्याचा धरलेल्या आग्रहामुळे स्टार्टअपसाठी नंदनवन खुले झाले आहे. सध्या देशातील सर्वाधिक स्टार्टअप हे मुंबई, पुण्यात होतात. मात्र, आपण त्याची योग्य नोंद ठेवत नाही. महाराष्ट्रात स्टार्टअपची राजधानी बनण्याची ताकद असून पुढील काळात पुणे ही देशातील स्टार्टअपची राजधानी करण्यासाठी राज्यशासन धोरण आखणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

लोकसत्ताच्या वतीने ‘स्टार्ट अप’ विषयावर आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ परिसंवादाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, केसरी पाटील, लोकसत्ताच्या प्रकाशिका वैदेही ठकार, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गिस आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता ज्या परिस्थितीतून जग, भारत चालला आहे, त्यामध्ये संधी खूप मोठी आहे. या संधीचा योग्य उपयोग करणे व त्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या तीनही क्षेत्रात स्टार्टअपला खूप संधी उपलब्ध आहे. सध्या सेवा क्षेत्र मोठ्या वेगाने वाढत असून एकूण देशांतर्गत उत्पादनामधील त्याचा हिस्सा 7 टक्क्यापर्यंत पोचला आहे. सेवा क्षेत्रात स्टार्टअपसाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहे. स्टार्टअप म्हणजे आलेली संधी समजून घेऊन त्याचा उपयोग करून त्याला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी त्या संधींचा विकास करणे होय. त्यासाठी कल्पना व्यावसायिकस्तरावर व्यवहार्य करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्याला कॅशलेस इकॉनॉमीने कशा प्रकारे जगता येईल, त्याला कर्ज मिळाल्यानंतर त्याचा विनियोग कशा प्रकारे कॅशलेस करता येईल, त्यासाठी स्टार्टअप तयार करता येईल. कृषी क्षेत्रात ई- मार्केटिंगमुळे वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सुरू करता येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्टार्टअपसाठी सुयोग्य वातावरण व व्यवस्था तयार करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण तयार जाहीर करणार असून त्यामध्ये स्टार्टअपसाठी सर्व सोयी देण्यात येणार आहेत. सध्या राज्य शासनाने मोठ्या रोजगार संधी व स्टार्टअपची शक्यता असलेल्या वेगवेगळ्या 11 क्षेत्रातील 110 कल्पना तयार करत आहोत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या व्यावसायिक जागांमधील 5 टक्के जागा स्टार्टअपसाठी सर्व व्यवस्थांसह द्यावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच पुण्यात स्टार्टअप पार्क उभारण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. तसेच राज्यात स्टार्टअप गावे करण्याचाही विचार सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोकसत्ताने आयोजित केलेला स्टार्टअप विषयावरील हा परिसंवाद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिसंवादाचा उपयोग राज्याचे धोरण ठरविण्यासाठी होणार असून या परिसंवादातील प्रमुख मुद्यांचा व सूचनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल.

यावेळी ‘खेळ संस्कृती : आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. लोकसत्ताचे संपादक श्री. कुबेर यांनी यावेळी दोन दिवसाच्या परिसंवादातील महत्त्वाच्या मुद्यांची माहिती दिली. श्रीमती ठकार व श्री. केसरी पाटील यांनी स्वागत केले, तर श्री. वर्गिस यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.