प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवल्यास देश स्वच्छ होईल- अमिताभ बच्चन


मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला तर देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी येत्या 2 ऑक्टोबरला प्रत्येक नागरिकाने आपला किमान एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य शासनाचा नगरविकास विभाग आणि एनडीटीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा क्लिनेथॉन’ या स्वच्छता मोहिमेंतर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. बच्चन बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, एनडीटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम चंद्रा, नितीश कपूर आदी उपस्थित होते.

श्री. बच्चन म्हणाले की, स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही सामुदायिक जबाबदारी असून प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या कचरा टाकू नये. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली तर त्यांच्या वर्तनात सुधारणा होईल, असा आशावाद व्यक्त केला. स्वच्छतेचे चांगले काम करणाऱ्यांचे कौतुकही केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

कोणत्याही योजनेत जनतेचा सहभाग असल्याशिवाय ती योजना यशस्वी होत नाही. यासाठी शौचालय बांधण्याबरोबरच त्याचा वापर करण्यासही प्रवृत्त केले पाहिजे. सर्वांनी येत्या 2 ऑक्टोबर रोजी आपला किमान एक तास स्वच्छतेसाठी देऊन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वितेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री. बच्चन यांनी केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात यावर्षी स्वयंसेवकांसाठी 50 लाख तास श्रमदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमात स्वयंसेवकांनी आतापर्यंत 33 लाख तास श्रमदान केले आहे. 26 जानेवारी 2017 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच 60 लाख तास श्रमदान पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण हागणदारीमुक्त शहरांमध्ये देशातील 10 शहरांपैकी 5 शहरे राज्यातील असून सध्या राज्यातील 15 शहरांमध्ये संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. या अभियानात महिलांचा चांगला सहभाग असल्याची माहिती श्रीमती म्हैसकर यांनी दिली. येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रत्येक शहरात एका ठिकाणी नागरिकांना जमण्याचे आवाहन करण्यात येऊन त्या भागाची स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने शौचालयांसाठी जागा निश्चित केल्यास सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्याठिकाणी ‘हायजेनिक टॉयलेट्स’ बांधण्यात येतील, असे नितीश कपूर यांनी सांगितले.

यावेळी बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर आणि नागपूर महानगरपालिकेचे महापौर प्रवीण दटके यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पाण्डेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह कागल, वेंगुर्ला, पाचगणी, सातारा, मुरगुड या नगरपालिकांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, तसेच पुणे व लोअर परळ येथील संपूर्ण स्वच्छ झालेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा श्री. बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन एनडीटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम चंद्रा यांनी केले.