सद्यस्थितीचा आढावा घेऊन शासन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार - डॉ.दीपक सावंत
उस्मानाबाद : डॉ.दीपक सावंत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शासन शेतकऱ्यांना शक्य ती सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन डॉ.सावंत यांनी यावेळी दिले. त्यानंतर झालेल्या बैठकीत सद्यस्थितीचा तात्काळ आढावा घ्यावा, शक्य तिथे पिकांचा पंचनामा करून त्याचा अहवाल तत्परतेने सादर करावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यातील टंचाई व सावकारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी पालकमंत्री डॉ.सावंत बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र गायकवाड , आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, राहुल मोटे , ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे उपस्थित होते.

सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील सद्यस्थिती, जिल्ह्याच्या समस्या त्यावरील प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती पालकमंत्री महोदय व इतर लोकप्रतिनिधींनी दिल्या.

त्यानंतर सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या विहीर अधिग्रहण, पिण्याच्या पाण्याची समस्या, पाणी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, टँकर पाणीपुरवठा, पीक विमा योजनेची अमंलबजावणी, पीक पाहणी, पिकांचा पंचनामा, बळीराजा चेतना अभियानाची फलश्रुती, रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, चारा छावण्यांची प्रलंबित देयके, सार्वजनिक विहिरींचे बांधकाम, पाझर तलावांची दुरूस्ती, जलयुक्त शिवार कामांची फलश्रुती आदी विषयांबाबत सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

यावेळी डॉ.सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे फक्त समस्या म्हणून न पाहता त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या बाबींचा अभ्यास करावा व विहित मार्ग अवलंबून जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, अशा सूचना त्यांना केल्या. त्याचबरोबर सावकारीबाबत बोलताना ते म्हणाले, प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींची सखोल माहिती लवकरात लवकर घ्यावी आणि त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करावी. प्रशासनाला सावकारी जाचाची माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांना तात्काळ तक्रार नोंदविता यावी यासाठी लवकरच एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.

शेवटी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना अवयवदान अभियानाविषयी माहिती दिली व आवाहन केले की, सर्वांनी अवयवदानासाठी ऑनलाईन नोंदणी करून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच या अभियानाच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना “ब्रॅंड ॲम्बेसेडर” म्हणून नेमावे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या अभियानाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करावा.
पालकमंत्र्यांनी केली पीकपाहणी

पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे दि.1 व 2 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी देवळाली, रूईभर, बेंबळी, आंबी ता.उस्मानाबाद. बेंडकाळ, जेवळी ता.लोहारा.बेन्नीतुरा ता.उमरगा या गावातील पीक परिस्थितीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अडीअडचणींबाबत एक सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याविषयी प्रशासनाला आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य शासनाकडून केले जाईल, असे सांगून पालकमंत्री डॉ.सावंत यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आश्वासित केले.