अवैध सावकारी रोखण्यासाठी कडक कारवाई करणार आणि तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार - दीपक केसरकर
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. हे थांबविण्यासाठी अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सावकारीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे उपस्थित होते.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसह अनेकांना सावकारीचा जाच सहन करावा लागत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अवैध सावकारांवर धडक कारवाई व तक्रारदारांना थेट तक्रारीची संधी निर्माण करून देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची सोय अशा दोन प्रकारे अवैध सावकारी थांबविण्याचे नियोजन करावे. शिवाय पिडीत लोकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक ती उपाययोजना तात्काळ सुरू करावी, असेही श्री.केसरकर म्हणाले.

शेवटी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून एकूणच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात त्यातही सावकारीच्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करावी, असे आदेश श्री.केसरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.