
मुंबई : राज्यातील बेपत्ता, घरातून पळून गेलेल्या, वाट चुकलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गृह विभागाने राबविलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' च्या माध्यमातून १५ हजारांवरील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलविण्यात यश आले आहे. यातील १३४८४ मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यातही आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे यातील १२९१२ मुलांची हरविल्याची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात नव्हती. घरातील वातावरणास कंटाळून, बालमजुरी, प्रेमप्रकरणे, शहरातील आकर्षण आदी कारणांमुळे अनेक मुले घर सोडतात आणि बसस्थानक, रेल्वेस्टेशन, सिनेमागृहे, आठवडा बाजार, मंदिरे, वीटभट्टी अशा ठिकाणी राहू लागतात. काही मुले बालमजुरी करतात तर काही थेट भीक मागून जगतात. त्यामुळे या मुलांचे समाजकंटकांकडून शोषण होण्याची शक्यता असते. शिक्षणापासून वंचित असलेल्या या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यात जुलै २०१५ पासून ४ वेळा वेगवेगळ्या टप्प्यात मुस्कान ऑपरेशन राबविण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. जी मुले पालकांच्या ताब्यात देण्यात आली नाहीत, त्यांना बालकल्याण समितीकडे सुपुर्द करण्यात आले आहे. त्यामुळे या ऑपरेशनमुळे निश्चितच हरवलेली, अपहरण झालेली व पालकांपासून दूर गेलेली बालके मिळण्यास मदत झाली आहे व दिशाहीन झालेल्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सावरण्यास मदत झाली आहे. |