पालक सचिव महेश पाठक यांनी घेतली विविध विभागाची आढावा बैठक
उस्मानाबाद : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या आढावा बैठकीत प्रामुख्याने खरीप पेरणी, खरीप अनुदान वाटप, पीक कर्ज, पिक विमा तसेच बळीराजा चेतना अभियानाबाबत विस्तृत चर्चा करुन त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती पालक सचिव यांना विशद केली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुपाली सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर पालक सचिव आणि इतर सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी कै.वसंतराव नाईक यांच्या 103व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.