प्रधानमंत्री पीक विमा योजना : विमा कंपन्यांनी मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आग्रही भूमिका

बातमी


मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आहे. त्यात सहभागी होण्यासाठी विमा कंपन्यांनी मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. त्यांनी आज प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतला.

या बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, विविध विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले, या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी दि.2 ऑगस्ट 2016 पर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे. मात्र राज्यामध्ये नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडून अगदी वेळेवर योजनेचे अर्ज उपलब्ध झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठीच्या मुदतीस अल्प कालावधी उरला असून अद्याप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी विमा कंपन्यांनी मुदतवाढ द्यावी, अन्यथा विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. या योजनेसाठी मुदतवाढ देण्याची भूमिका राज्य शासनाची असून विमा कंपन्यांनी त्यासाठी सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. अन्य सहा राज्यांमध्ये या योजनेसाठीची मुदत 15 ऑगस्ट आहे. महाराष्ट्रात मुदतवाढ देण्यासाठी विमा कंपन्यांनी मधला मार्ग काढावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

राज्यामध्ये या योजनेसाठी सहा क्लस्टर करण्यात आले असून चार विमा कंपन्यांना ते विभागून देण्यात आले आहे. पहिल्या क्लस्टरमधील लातूर, अकोला, हिंगोली, सांगली, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ‘इफको टोकियो’ ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. तर उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार, सिंधुदूर्ग, रायगड या दुसऱ्या क्लस्टरसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. जालना, जळगाव, वाशिम, सोलापूर, भंडारा, सातारा या तिसऱ्या क्लस्टरसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. चौथे क्लस्टर असलेल्या परभणी, अमरावती, वर्धा, धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि पाचवे क्लस्टर असलेल्या बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर यासाठी रिलांयन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, पुणे या सहाव्या क्लस्टरसाठी एचडीएफसी अरगो विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.