सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आढावा बैठक
उस्मानाबाद : सहकार विभागाची आढावा बैठक घेऊन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा उपनिबंधक के.बी.वावळे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुका सहनिबंधक उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.देशमुख म्हणाले, शासनाने उस्मानाबाद जिल्हा विकासाचा केंद्रबिंदू मानून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरविले आहे तसेच जिल्ह्यात डबघाईला आलेल्या सहकारी संस्था, पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे पुनरुज्जीवन करावे लागणार आहे . हा जिल्हा मागासलेला असल्यामुळे या जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार संधींची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी सहकार विभागाने जिल्ह्यात शीतगृहे, खवागृहे तसेच शेळी पालन आणि उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी केल्या.

जिल्ह्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या ज्या सभासदांची नावे सातबाऱ्यावर आहेत अशांनाच सोसायटी सभासद करण्यास संधी दिली जाऊन सोसायटी सक्षम करण्यास सहकार विभागाने लक्ष द्यावे. हा जिल्हा रोल मॉडेल म्हणून पुढे यावा, अशीही अपेक्षा श्री.देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.