
रिपोर्टर..: काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या सीमेचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या कर्नल संतोष महाडिक यांची वीरपत्नी स्वाती यांनी पतीच्या पार्थिवासमोर आपण व आपली मुलेदेखील लष्करातच दाखल होणार, अशी केलेली प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली आहे. स्वाती महाडिक या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आता चेन्नईत अधिकारी प्रशिक्षण अकादमीत आणखी कठोर, खडतर प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या आहेत. या प्रशिक्षणानंतर त्या लष्कराच्या 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये अधिकारी म्हणून दाखल होणार आहेत.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है... असेच देशप्रेम शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबाच्या नसानसात भिनल्याची प्रचिती वीरपत्नी स्वाती यांच्या निर्णयातून आली आहे. सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सुपुत्र असलेले कर्नल संतोष महाडिक यांना 17 नोव्हेंबर 2015 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात लढताना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव गावी आणल्यानंतर त्यासमोरच वीरपत्नी स्वाती यांनी आपण व आपली मुले लष्करातच दाखल होऊन देशसेवा बजावतील, अशी प्रतिज्ञा केली होती. मात्र, लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी सर्वप्रथम वयाची अट आड येत होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या विनंतीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी लष्कर भरतीसाठी असलेली वयाची अट या वीरपत्नीसाठी शिथिल केली.
अर्थात, ही सवलत फक्त वयासाठी मिळाली. मात्र, लष्करी सेवेसाठी आवश्यक असलेली सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची अवघड व खडतर अशी परीक्षा उत्तीर्ण होणे भाग होते. विलक्षण देशप्रेम असलेल्या स्वाती यांनी ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. लष्करी गणवेश मिळविण्यासाठी एका सामान्य सैनिकाला जे काही करावे लागते, ते सर्व खडतर परिश्रम त्यांनी घेतले आहेत. आपली प्रतिज्ञा स्वाती यांनी अवघ्या सहा-सात महिन्याच्या आत पूर्ण केली आहे.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच स्वाती या प्रशिक्षणासाठी चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत दाखल झाल्या आहेत तर त्यांचा मुलगा पाचगणीत तर मुलगी डेहराडून येथे शिक्षण घेत आहे. चेन्नईतील अकादमीत स्वाती यांच्यासोबतचे उमेदवार त्यांच्यापेक्षा किमान 10 वर्षांनी लहान आहेत. स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावे लागणार असून लष्करी अधिकार्याला साजेशी शरीररचना, व्यायाम, प्रशिक्षणासाठी तयारी करावी लागणार आहे. स्वाती यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि देशातील जनतेशी असलेली बांधिलकी यामुळे लष्करातील वरिष्ठ अधिकारी अत्यंत प्रभावित झाले आहेत. स्वाती यांच्या पूर्वी अनेक वीरपत्नी लष्करात दाखल झाल्या आहेत. 2012 मध्ये अरुणाचल प्रदेशात शहीद झालेले नाईक अमित शर्मा यांची पत्नीही 2014 मध्ये लष्करात दाखल झाली आहे.