वारीतील वाहनांना टोल माफीसाठी प्रयत्न करणार; निधी वाढवून देण्यासाठीही पुढाकार घेणार- गिरीश बापट


पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे 
: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या कालावधीत दिंड्यातील वाहनांना टोल माफी मिळावी आणि संबंधित ग्रामपंचायती, नगरपरिषदा यांच्या निधीत वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या कालावधीत आरोग्य, वाहतूक, पिण्याचे पाणी, रस्त्यांची व्यवस्था, स्वच्छता आणि कायदा आणि सुव्यवस्था याबाबतीत सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे आणि त्यांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही श्री. बापट यांनी दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. बापट आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधानभवन येथे बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री बापट यांनी या सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, खासदार अमर साबळे, सर्वश्री आमदार बाबुराव पाचर्णे, ॲड. राहुल कुल, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, दत्तात्रय भरणे, ॲड. रामहरी रूपनवर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आदी उपस्थित होते.

श्री.बापट यांनी सांगितले की, दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या वाहनांना टोल माफी देता येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्राथमिक तत्वावर चर्चा केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. पालखीचा मुक्काम ज्या ग्रामपंचायत हद्दीत किंवा नगरपरिषदांच्या हद्दीत असतो, त्यांना दिला जाणाऱ्या निधीत वाढ करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर या निधीत वाढ करण्यासाठी आपण सकारात्मक असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल.

बैठकीत प्रथम पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्याच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही पालख्या पुणे जिल्ह्यात ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी एकदिशा मार्ग केला जाणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांची अन्न आणि औषधे प्रशासनाच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबरल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत बलगटाची पथके तैनात केली जाणार आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी वीजपुरवठा अखंडीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीची फिरती पथके तैनात केली जाणार आहेत.

त्याचबरोबर दिंडी प्रमुखांनी अनुदानित सिलिंडरसाठी आवश्यक तो अर्ज भरून संबंधित विभाग किंवा गॅस कंपनी यांच्याकडे सुपुर्द करावा. त्यामुळे त्यांना अनुदानित सिलिंडर देता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राव यांनी सांगितले.

यावेळी पालखी तळावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, इंदापूरमधील कचरा डेपोमधून जाणाऱ्या पालखी मार्गाच्या दुतर्फा पत्र्याचे कुंपण करावे, सासवडच्या पुलाची दुरूस्ती करावी, पालखी मार्गावरील विहीरींचे अधिग्रहणही करावे, त्याचबरोबर पाण्याची तपासणी करावी, आवश्यक तिथे रस्ता रूंदीकरण आणि साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, मोबाईल कनेक्टिव्हिटी सुरळीत राहावी यासाठी फिरते मोबाईल टॉवर उभे करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी सातारा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, सोलापूर जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे त्याचबरोबर पोलीस, आरोग्य, परिवहन, पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि अतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना

• पालखी मार्गावरील खासगी रूग्णालयातील खाटा आरक्षित ठेवणार
• आळंदी परिसरातील गावांच्या स्वच्छतेसाठी निधी देणार
• आपत्ती काळात वायरलेसचा वापर करा.
• माबाईल कनेक्टिव्हिटीसाठी फिरते मोबाईल टॉवर उभारणार.
• स्वच्छतेसाठी सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून शौचालये उभारणार.
• पालखी तळावरील अतिक्रमणे काढा, स्वच्छता ठेवा.
• दिंडीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी करणार.