विवाहितेचा विष पाजून खून

घनसावंगी - सोन्याची साखळी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून 24 वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी विषारी औषध पाजून खून केला. ही घटना अंतरवाली दाई ता. घनसावंगी येथे घडली. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगा ता. अंबड येथील दत्ताभाऊ गंगाधर गायकवाड यांची मुलगी शिवकन्या हिचा विवाह अंतरवाली दाई येथील सुरेश लोहकरे यांचा मुलगा श्रीकांत याच्याशी 12 मे 2014 रोजी झाला होता. तेव्हापासून शिवकन्या हिला पती श्रीकांत, सासू द्वारकाबाई, सासरा सुरेश, दीर हरी यांनी "तू आम्हाला पसंत नाही, तुला कामधंदा येत नाही, तसेच सोन्याची साखळी खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून सतत माराहण करीत असत. वडील दत्ताभाऊ गायकवाड व त्यांच्या नातेवाइकांनी अनेकवेळा अंतरवाली दाई येथे जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फायदा झाला नाही. दरम्यान, रविवारी शिवकन्येला विषारी औषध पाजून तिचा खून करण्यात आला, असा आरोप करीत वडील दत्तात्रय गायकवाड यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर करीत आहेत.