केंद्रीय पथकाने केली लोकसहभागातून केलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांची वाहवा !


उस्मानाबाद : जिल्ह्यात दुष्काळी भागात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्याकरिता आज केंद्र शासनाच्या प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या केंद्रीय पथकाने विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून आणि लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या पथकाच्या प्रमुख होत्या केंद्रीय सहसचिव श्रीमती आय. राणी कुमुदिनी आणि या पथकामध्ये संचालक आर.पी.सिंग, सहायक आयुक्त डॉ.एच.आर. खन्ना, सहायक संचालक श्री.डी.के.मिश्रा आणि वरिष्ठ सल्लागार जी.आर. झरगर या अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी या पथकासोबत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, आपती व्यवस्थापन विभागाचे विभागीय प्रमुख श्री.दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा कृषी अधीक्षक श्री.जमदाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.मुकणे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

या केंद्रीय पथकाने परांडा, भूम, वाशी तालुक्यातील आसू, सोनगिरी, सिना कोळेगाव, अनाळा, अंबी, पाथरुड, पारगाव येथील चारा छावण्या आणि नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी केली. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारने दुष्काळी भागातील उपाययोजनांकरिता जो निधी मागितला आहे त्याबाबत नक्की काय वस्तुस्थिती आहे याची पाहणी करण्यासाठी या पथकाने हा दौरा केला.

अंबी येथील चारा छावण्यांच्या चारापुरवठा, पाणीपुरवठा, जनावरांची औषधे, अनुदान आदी बाबींविषयी त्यांची माहिती घेतली. येथे सरपंच उषा चंद्रसेन गटकळ यांनी गावकऱ्यांच्या वतीने शासनाने दुष्काळग्रस्तांना केलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले.