रामदरा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी 100 कोटी तात्काळ देणार - गिरीष महाजन
उस्‍मानाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ तसेच कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र.1 उस्मानाबाद यांच्या एकत्रित प्रयत्नाने तुळजापूर तालुक्यातील रामदरा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी 100 कोटीचा निधी तात्काळ दिला जाईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शुक्रवारी येथे केली.

श्री.महाजन हे जिल्ह्यातील तुळजापूर, वाशी, भूम तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीकरिता दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी श्री.महाजन यांनी ही योजना 6 ते 8 महिन्यात पूर्ण करण्याविषयी अथक प्रयत्न सुरु आहेत, असे सांगितले. त्याचबरोबर तुळजापूरचा पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास व्हावा या दृष्टीनेही प्रयत्न केले जातील, याकरिता योजना प्रस्तावित करावी तसेच जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व धरणांचे सर्वेक्षण करुन पावसाळ्यापूर्वी त्यातील पाण्याची गळती होणार नाही याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.