महाराष्ट्रातील नीटच्या लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न- विनोद तावडेविद्यार्थ्यांसाठी मोबाईल अॅप्लिकेशन; राष्ट्रपतींची भेट घेणार
केंद्र सरकारचा अधिसूचना काढण्याचा विचार

मुंबई 
: 'नीट' परिक्षेला बसलेल्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून महाराष्ट्र सरकारच्या आग्रहाखातर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी देशातील तसेच सर्व राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांची सोमवारी (दि.16 मे) नवी दिल्लीत बैठक बोलाविली आहे. या बैठकीला आपण उपस्थित राहणार असून सर्वोच्च न्यायालयाने नीटसंदर्भात दिलेल्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तावडे बोलत होते.

यासदर्भात केंद्र सरकारच्या वतीने अधिसूचना काढता येऊ शकते काय ? याचाही विचार सर्व मंत्र्यांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 24 जुलै रोजी होणाऱ्या नीट परिक्षेची महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दूरदर्शन, खासगी न्यूज चॅनेल, इंटरनेट अथवा यु ट्यूबमार्फत प्रथितयश शिक्षणतज्ज्ञाचे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून येत्या 19 मेपासून हे प्रसारण सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही श्री. तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच नीटसंदर्भात केंद्र सरकारला अधिसूचना काढता येऊ शकते किंवा नाही, अधिसूचना काढल्यास त्याबाबतचे कायदेशीर मुद्दे आदी सर्व मुद्यांचा विचारविमर्श करण्यात येणार असल्याचे सांगताना श्री. तावडे म्हणाले, 24 जुलै रोजी होणाऱ्या नीट परिक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे योग्य पद्धतीने कोचिंग होण्यासाठी या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे. दूरदर्शन आणि खासगी न्यूज चॅनेल्सवर विशिष्ट वेळेत दर दिवशी एक तास हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही वाहिन्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता प्रसारणाची तयारी दर्शविली आहे. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कोचिंगचे विभागाच्या वतीने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येईल. नीट परिक्षेचा अभ्यास कसा असेल, परिक्षेची पूर्व तयारी कोणत्या पद्धतीने करायची याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नीटसाठी सरकार ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या बातमीमुळे खासगी कोचिंग क्लास चालकांचे धाबे दणाणले आहेत. म्हणून सरकारी कोचिंग एचएससी बोर्डाच्या शिक्षणतज्ज्ञांमार्फत देण्यात येईल, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे. परंतु राज्याचे विशेष कोचिंग नक्कीच प्रभावी असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच श्री. तावडे यांनी सांगितले की, हे प्रशिक्षण सहा दिवस चालणार असून सातव्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार असून त्यांच्या प्रश्नांना शिक्षणतज्ज्ञांमार्फत उत्तरे दिली जातील. महाराष्ट्र सरकार नीट परिक्षेसाठी बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेरपर्यंत लढा देणार आहे. प्रसंगी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीने राष्ट्रपतींची भेट घेतली जाईल, हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल आणि यामधून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.