चार वर्षात पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करून राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार- मुख्यमंत्रीबातमी

मुंबई : राज्यात मेट्रो, ट्रान्सहार्बर सी-लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असून येत्या चार वर्षात ते पूर्ण करून राज्याचा चेहरा मोहरा बदलू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीने चर्चगेट येथे आयोजित ‘रिसर्जंट इंडिया - महाराष्ट्र लिडस् द वे’ या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चेंबरचे अध्यक्ष दिलीप पिरामल, दीपक प्रेमनारायण, चेंबरच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शालिनी पिरामल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जगाचे लक्ष भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लागले आहे. देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारताकडे असून या मनुष्यबळाकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील काळात जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी भारताकडे आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2019 ला पहिले विमान उड्डाण करेल

श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. ट्रान्सहार्बर सी-लिंक, कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांचे काम गेल्या काही काळापासून रखडले होते. मात्र नवीन सरकार आल्यानंतर या कामांना गती देण्यात आली असून या प्रकल्पांसाठीचे सर्व परवाने मिळाले असून त्यांचे प्रकल्प अहवाल येत्या तीन महिन्यात अंतिम करून त्यांच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. ट्रान्सहार्बर सी-लिंकच्या कामाची निविदा 31 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येईल. तर मेट्रोच्या कामाची निविदाही येत्या तीन महिन्यात देण्यात येणार आहेत. याशिवाय उपनगरीय छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल व चर्चगेट ते विरार या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे कामही तातडीने सुरू करण्यात येणार असून 15 ऑगस्टपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करून निविदा देण्यात येणार आहे. ही सर्व वाहतुकीची साधने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. एकाच तिकिटावर या साधनांमधून प्रवास करता येणार असून हे तिकिट मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

एका वर्षाच्या काळात राज्य शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व परवाने मिळविले असून 3 महिन्यात याचे काम सुरू होईल. या विमानतळावरून 2019 मध्ये पहिले विमान उडालेले तुम्हाला दिसेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे मुळे 20 जिल्ह्यांना फायदा होणार असून हा महामार्ग जालना व वर्धा ड्राय पोर्ट यांना जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बरोबर जोडणारा आहे. यामुळे नागपूर ते जेएनपीटी हा प्रवास आठ तासात तर औरंगाबाद ते जेएनपीटी हा प्रवास चार तासात होणार आहे. यातून उत्पादन क्षेत्राची वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गेल्या चार वर्षापासून टंचाई स्थिती आहे. या वर्षी राज्यातील 28 हजार गावांमध्ये टंचाईची स्थिती आहे. टंचाईचा सामना करण्याचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्यासारख्या उपाययोजना सुरू आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याचे स्त्रोत पुनर्जिवित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून ते मुरविण्याचा एकात्मिक आराखडा राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून सहा हजार गावांमध्ये ही योजना सुरू केली आहे. येत्या पाच वर्षाच्या काळात राज्याला दुष्काळापासून मुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कृषी क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी फार्म टू फॅशन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अमरावती औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत आठ उद्योजकांनी सहभाग घेतला असून चार उद्योगांचे कामही सुरू झाले आहे. याबरोबरच या उद्योगाला मदतीसाठी ॲपरल पार्कही येथे उभारण्यात येणार आहे. मूल्यवर्धित सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. उद्योगांच्या सोयीसाठी परवान्यांची संख्या कमी करून ती ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकसेवा हमी कायद्यामुळे वेळेत आणि रास्त दरात सेवा देण्यात येत आहे. शासनाने कमी कालावधीत राबविलेल्या या उपाययोजनांमुळे राज्य पुन्हा उच्च स्थानावर जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री सहायता निधीस चेंबरकडून 25 लाखांचा निधी

राज्यातील दुष्काळ परिस्थितीत मदत म्हणून इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाखांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश चेंबरचे अध्यक्ष श्री. पिरामल व श्री. प्रेमनारायण यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिला.

यावेळी उत्पादन निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल व्हॅरॉक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन व इंड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. पिरामल यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. श्री. प्रेमनारायण यांनी आभार मानले.