कायद्याची दहशत निर्माण करुन कामठी गुन्हेगारीमुक्त करु- मुख्यमंत्रीबातमी
.


नागपूर 
: शहरात ज्याप्रमाणे कायद्याची दहशत निर्माण झाली, त्याचप्रमाणे कामठी शहर व पूर्ण तालुक्यात कायद्याचे राज्य निर्माण करुन कामठी गुन्हेगारीमुक्त करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कामठी शहर, जुनी कामठी व हिंगणा तालुका नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात विलिनीकरण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आमदार सर्वश्री जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, गिरीश व्यास, कामठीच्या नगराध्यक्षा रिजवाना कुरैशी, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, सहआयुक्त श्री.राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्री.तरवाडे, श्री.कदम, पोलीस अधीक्षक श्री.रोकडे उपस्थित होते.

गावांचे शहरीकरण होत असताना शहरांना येणाऱ्या समस्यांची आव्हाने गावांनाही सोसावी लागतात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कामठीचे शहरीकरण झाल्यामुळे व गुन्हेगारीमुक्त कामठी व्हावे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कामठी पोलीस आयुक्तालयात विलीन करण्याची मागणी आमदार झाल्यापासूनची होती, ती आता पूर्ण होत आहे.

पोलीस आयुक्तालय टीमने गेल्या 2-3 महिन्यात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. गुन्हेगारी असलेले शहर असे नागपूरकडे पाहून म्हटले जायचे. पण आता गुन्हेगारांची दहशत संपवून कायद्याची दहशत या शहरात निर्माण झाली. गुंडांना पोलिसांची दहशत बसली. गुंडांना जेरबंद करण्याचे चांगले काम या टीमने केले आहे. कामठीही अतिसंवेदनशील शहरांच्या यादीत होते. आता पोलीस आयुक्तालयात कामठी विलीन झाल्यामुळे कामठीही गुन्हेगारीमुक्त करु. गुंड नेहमी राजकीय आश्रय मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. गुंडांना राजकीय आश्रय मिळाला नाही तर कामठी तालुका निश्चितच गुन्हेगारीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागपूर पोलीस आयुक्तांनी 4 महिन्यात 25 टक्क्यापेक्षा जास्त गुन्हगारी संपविली आहे, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कामठीतही कायद्याची दहशत निर्माण होईल. आम्ही सार्वजनिक जीवनात असतो आमच्यासोबत कुणीही फोटो काढतो. पण पोलिसांनी गुन्हेगार ओळखावे आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यावे. चुकीच्या लोकांना कायद्याने ठोकून काढा. गृहविभाग अत्यंत पारदर्शकपणे काम करीत आहे. नागपूरप्रमाणे संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्यास सरकार यशस्वी होईल.
मुख्यमंत्र्यांमुळेच मागणी पूर्ण- चंद्रशेखर बावनकुळे

कामठी शहर व तालुक्यात नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात विलीन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांमुळे पूर्ण झाल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. जामठा येथील व्हीसीए, मिहान पोलीस आयुक्तालयात नियंत्रणात यावे असे आधीपासूनच वाटत होते, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. कामठी पोलीस आयुक्तालयात विलीन होण्याचा आनंद यासाठी आहे की कामठी आता गुन्हेगारीमुक्त होईल. नागपूर शहराप्रमाणेच पोलीस आयुक्तांची टीम आता लवकरच कामठी गुन्हेगारीमुक्त करण्यास यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरात पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करणे, पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या इमारती, 6 नवीन पोलीस ठाणे, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे ही सर्व कामे लवकरच आपण पूर्णत्वास नेणार आहोत. तसेच जिल्हा नियोजन समितीही 150 कोटींची होती. मुख्यमंत्र्यांनी ती 350 कोटींची केली. निधी उपलब्ध करुन दिला. हा निर्णयही फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच होऊ शकला.

कामठीजवळच असलेल्या अब्दुल्ला शहा दर्ग्याला 2 कोटी दिले. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला 10 कोटी दिले. बौद्ध उपासकांसाठी आता येथे बुद्धिष्ट सर्किट तयार केले जात आहे. भविष्यात कामठी नगरपरिषदेला मुख्यमंत्र्यांनी ‘अ’ दर्जा द्यावा व मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रो कन्हान-कामठीपर्यंत आणावी, अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

ॲड. कुंभारे यांनी कामठी शहर गुन्हेगारीमुक्त व्हावे, हे आव्हान मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी स्वीकारावे असे सांगितले. तर खासदार श्री.तुमाने यांनी पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने अधिक पोलीस ग्रामीणमध्ये निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

कामठी शहराचा समावेश झोन 5 मध्ये राहणार असून झोन 5 चे पोलीस आयुक्त अविनाशकुमार राहतील. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी प्रास्ताविकात नागपूर पोलीस आयुक्तालयाची माहिती दिली. आतापर्यंत 25 पोलीस ठाणे होते. त्यात आता 3 ठाण्यांची वाढ झाली. भविष्यात 30 पोलीस ठाणे निर्माण केले जातील. जनतेत पोलिसांची प्रतिमा चांगली व्हावी व जनतेशी चांगले संबंध निर्माण व्हावेत म्हणून फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून पोलीस खाते नागरिकांच्या संपर्कात राहते. पोलिसांच्या सर्व वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे. नागरिकांच्या पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळत असून नव्याने बजाजनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रक्रिया सुरु असल्याचेही ते म्हणाले. यावेळी टूरिस्ट पोलीस व्हॅनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ऐन मध्यान्ही सूर्य 45 अंशाने तापत असताना कामठीच्या पोलीस ठाणे प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचे कौतुक

पालकमंत्री श्री.बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात कौतुक केले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण व विकास कामांसाठी श्री.बावनकुळे यांनी चांगले काम केले आहे. नागपूर आणि कामठीत लवकरच सीसीटीव्ही लावावेत ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करुन कामठी अ वर्ग नगरपालिका करण्याचा व मेट्रो दुसऱ्या टप्प्यात कन्हान-कामठीपर्यंत आणण्याची पालकमंत्र्यांनी केलेली मागणी पूर्ण होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.