रेल्वेने लातूरसाठी महिनाभरात 6 कोटी 20 लाख लिटर पाणी


लातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन तातडीचा उपाय म्हणून सुरु करुण्यात आलेल्या पाण्याच्या रेल्वेने महिनाभरात एकूण 6 कोटी 20 लाख लिटर पाणी आणले आहे. पाणी घेऊन येणाऱ्या जलदूतची पहिली फेरी 12 एप्रिल रोजी झाली होती. गुरुवारी रेल्वेने होणाऱ्या पाणी पुरवठ्याला 1 महिना पूर्ण झाला आहे.

शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रसंगी रेल्वेनेही पाणी पुरवठा केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मार्च रोजी आयोजित आढावा बैठकीनंतर येथे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी 5 एप्रिल रोजी लातूर रेल्वेस्थानकाची पाहणी करुन 15 दिवसात रेल्वेने पाणी पुरवठा सुरु होईल असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात 12 एप्रिल रोजीच 10 टँकरच्या रेल्वेची पहिली खेप झाली आणि त्यानंतर 20 एप्रिल पासून 50 टँकरने 25 लाख लिटर पाणी दररोज आणले जावू लागले. या पद्धतीने आजवर शहरासाठी महिनाभरात 6 कोटी 20 लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे.

पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेने तत्परतेने सेवा पुरविली असून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार सोलापूर, मिरज आणि लातूर येथील रेल्वेचे अधिकारी जलदूतच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वेने आलेले पाणी उतरवून घेणे, ते विहीरीत साठविणे, त्याची जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहतूक करणे आणि नंतर त्याचे टँकरने वितरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याकरीता जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, महापालिका आदींनी युद्धपातळीवर काम केले. महापालिकेने पाणी वितरणांचा तपशील आता वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात केली आहे. वितरणासाठी तैनात करण्यात आलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन एकूण यंत्रणेची 29 एप्रिल रोजी पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी वेळोवेळी रेल्वेस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टँकरद्वारे वितरणाची नुकतीच संबंधीत प्रभागांत जाऊन पाहणी केली. दैनंदिन वितरणांसाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने मोठी यंत्रणा कामाला लावली असून गेले महिनाभर ही यंत्रणा लातूरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेत आहे. लातूर शहराभोवतीचे पाण्याचे स्त्रोत अपुऱ्या पावसामुळे रोडावत असतांना, गेले महिनाभर रेल्वेने पुरविलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळण्यास चांगलीच मदत झाली आहे.